Join us

अलिबागमध्ये  म.रा.वि.मं. अधिकारी संघटनेचे ४३ वे राज्यस्तरीय अधिवेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2020 1:38 PM

वीज क्षेत्रात झपाट्याने होत असलेले बदल, आव्हाने, ग्राहकाभिमुख उत्तमोत्तम सेवा, अधिकाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, वीज क्षेत्र विषयक भविष्यकालीन उपाययोजना याबाबत सदर अधिवेशनात तपशीलवार चर्चा होणार आहे.

मुंबई - राज्याच्या  विद्युत क्षेत्रातील महावितरण, महानिर्मिती, महापारेषण आणि सूत्रधारी या कंपन्यांमध्ये कार्यरत वित्त व लेखा, मानव संसाधन, औद्योगिक संबंध, माहिती तंत्रज्ञान, वैद्यकीय, जनसंपर्क, सुरक्षा व अंमलबजावणी आणि विधी अशा अधिकाऱ्यांचे विविध प्रश्न व समस्या सोडविण्याकरीता झटणाऱ्या म.रा.वि.मं.अधिकारी संघटनेचे ४३ वे राज्यस्तरीय अधिवेशन अलिबाग  येथे ८ व ९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. अधिवेशनाचे उद्घाटन रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांचे हस्ते  होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून महापारेषणचे  प्रभारी संचालक (वित्त) अनिल कालेकर आणि कार्यकारी संचालक (मानव संसाधन) सुगत गमरे उपस्थित राहणार आहेत.

महावितरणचे  मुख्य महाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) अविनाश हावरे, मुख्य महाव्यवस्थापक (सांघिक वित्त) सतीश तळणीकर आणि मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यभरातील तिन्ही कंपन्यांचे शेकडो अधिकारी ह्या अधिवेशनाला उपस्थित राहणार असून अधिवेशनाचे आयोजन सुरुची रिसॉर्ट, कुरुल, नागाव रोड, अलिबाग  येथे करण्यात आले आहे. म.रा.वि.मं.अधिकारी संघटनेचे अध्यक्ष विकास आढे, सरचिटणीस दिलीप शिंदे आणि संघटन सचिव प्रविण बागुल यांच्या नेतृत्वाखाली हे अधिवेशन संपन्न होणार आहे. 

वीज क्षेत्रात झपाट्याने होत असलेले बदल, आव्हाने, ग्राहकाभिमुख उत्तमोत्तम सेवा, अधिकाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, वीज क्षेत्र विषयक भविष्यकालीन उपाययोजना याबाबत सदर अधिवेशनात तपशीलवार चर्चा होणार आहे. शनिवार ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता उद्घाटन सोहळा तर दुपारच्या सत्रात वीज कंपन्या व संघटनेची भविष्यकालीन वाटचाल व आव्हाने यावर मान्यवर अतिथी मार्गदर्शन करणार आहेत.तसेच संघटनेच्या द्विवार्षिक कार्यकारिणीची निवड सुद्धा करण्यात येणार आहे. रविवार १० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पतसंस्थेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे.

यंदा संघटनेच्या ४३ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे यजमानपद मुख्य कार्यालय, मुंबई व कल्याण  परिमंडळाकडे असून, अधिवेशनाच्या यशस्वितेसाठी सुनिल पाठक, शंकर गोसावी, अनिल बराटे, सचिन राठोड, विजय पाटील, अजय निकम, अविनाश कर्णिक, अविनाश कर्णिक यांचेसह  परिमंडळातील संघटनेचे पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत. 

टॅग्स :वीजमुंबई