'महावितरण'द्वारे १ कोटी ६६ लाख ग्राहकांना स्मार्ट वीज मीटर!

By सचिन लुंगसे | Published: August 6, 2022 07:20 PM2022-08-06T19:20:18+5:302022-08-06T19:21:12+5:30

ग्राहकांना दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा मिळण्यावर भर

MSED Mahavitaran to provide 1 Crore 66 lakh customers smart electricity meters | 'महावितरण'द्वारे १ कोटी ६६ लाख ग्राहकांना स्मार्ट वीज मीटर!

'महावितरण'द्वारे १ कोटी ६६ लाख ग्राहकांना स्मार्ट वीज मीटर!

Next

मुंबई: राज्यातील वीज वितरण यंत्रणा स्मार्ट करण्यासाठी तब्बल ३९ हजार ६०२  कोटींच्या सुधारीत वितरण क्षेत्र योजनेत महावितरणद्वारे १ कोटी ६६ लाख ग्राहकांना स्मार्ट वीजमीटर बसविण्यात येणार आहेत. हे स्मार्ट मीटर बसविल्यामुळे ग्राहकांना अचूक वीजबिल मिळणार असल्याने महावितरणची वितरण हानी कमी होऊन महसुलात वाढ होईल. परिणामी ग्राहकांना दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा मिळेल, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली आहे.

राज्यातील वीज वितरण यंत्रणा स्मार्ट करण्यासाठी तब्बल ३९ हजार ६०२  कोटींच्या सुधारीत वितरण क्षेत्र योजनेला राज्य शासनाने नुकतीच मंजूरी दिली आहे. यापैकी ग्राहकांसोबतच वितरण रोहीत्रे आणि वीज वाहिन्यांचे स्मार्ट मिटरींग करण्यासाठी  ११ हजार १०५ कोटींची अंदाजित तरतुद करण्यात येणार आहे.  यात सर्व वर्गवारीतील एकूण १ कोटी ६६ लाख ग्राहकांना तसेच ४ लाख ७ हजार  वितरण रोहीत्र तर २७ हजार ८२६ वीज वाहिन्यांना स्मार्ट मीटर बसविण्याचे या योजनेत  प्रस्तावित करण्यात आले आहे.

राज्याचा झपाट्याने होणारा औद्योगिक विकास आणि त्यामुळे होणारे शहरीकरण लक्षात घेता भविष्यात विजेच्या मागणीचे योग्य नियोजन व्हावे‚ ग्राहकांना अपघातविरहीत आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणद्वारे वीज यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी सुधारीत वितरण क्षेत्र योजना राबविण्यात येणार  आहे.  यात ग्राहकांसाठी स्मार्ट प्रीपेड मीटरिंग सोबतच  वाणिज्यिक, औद्योगिक व शासकीय ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर बसविणे, वितरण रोहित्रे (Distribution Transformers) आणि वाहिन्यांना (Feeders) संवाद-योग्य (Communicable) आणि अत्याधुनिक मीटरींग सुविधा (Advanced Metering Infrastructure) प्रणालीसाठी सुसंगत मीटरिंग करण्यात येणार आहे. याशिवाय मीटर नसलेल्या वाहिन्यांचे मीटरिंग आणि विद्यमान मीटर ऑनलाइन करणे आदी कामांसाठी ११ हजार १०५  कोटींची तरतूद करण्यात आली असल्याचे विजय सिंघल यांनी सांगितले आहे.

या योजनेंतर्गत १५ टक्क्यांपेक्षा अधिक वाणिज्यिक व तांत्रिक हानी असलेल्या अमृत शहरांच्या विभागातील  ३७ लाख ९५ हजार ४६६ ग्राहकांकडे हे स्मार्ट मीटर बसविण्यात येतील.   वाणिज्यिक व तांत्रिक हानी १५ टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या अमृत शहराच्या विभागाच्या व्यतिरिक्त इतर शहरी विभागातील २ लाख ६० हजार ४१७ ग्राहक तर ग्रामीण भागातील २६ लाख ६७ हजार ७०३ स्मार्ट मीटर बसविण्यात येतील. सर्व व्यावसायिक, औद्योगिक, शासकीय व उच्चदाब वीजवापर असलेले २६ लाख ९५ हजार ७१६ ग्राहकांकडे देखील हे स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत.  तसेच या विभागांमधील २५ केव्हीए क्षमतेवरील बिगर शेतीसाठीची २ लाख ३० हजार ८२०  वितरण रोहीत्रे आणि २७ हजार ८२६ वितरण वीजवाहिन्यांवर स्मार्ट मीटर बसविण्याचे नियोजन केले आहे. ही सर्व कामे डिसेंबर २०२३ पर्यंत पुर्ण करावयाची आहे. याशिवाय मार्च २०२५ पर्यंत  वाणिज्यिक व तांत्रिक हानी १५ टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या अमृत शहरातील ५५ लाख ३८ हजार ५८५  वीज ग्राहकांकडेही हे स्मार्ट मीटर बसविले जातील. वाणिज्यिक व तांत्रिक हानी २५  टक्क्यांपर्यत  असलेल्या अमृत शहराच्या विभागाव्यतिरिक्त ग्रामीण विभागातील १६ लाख ६० हजार ९४६  ग्राहकांना स्मार्ट मीटर  आणि या विभागातील २५ केव्हीए क्षमतेवरील बिगर शेतीसाठीची १लाख ७६ हजार ६८७  वितरण रोहीत्रांचे स्मार्ट मिटरिंग करण्यात येणार  अशा एकूण १ कोटी ६६ लाख ग्राहकांना तर ४  लाख ७ हजार  वितरण रोहीत्रांना आणि २७ हजार ८२६ वीज वाहिन्यांना स्मार्ट मीटर बसविणे प्रस्तावित असल्याचे देखील विजय सिंघल यांनी सांगितले आहे.

Web Title: MSED Mahavitaran to provide 1 Crore 66 lakh customers smart electricity meters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.