नवी मुंबई : खारघर येथील महावितरणच्या कार्यालयावर शेकापच्या वतीने आज भव्य मोर्चा काढण्यात आला. फणसवाडी येथील आदिवासी पाडय़ात सुरू असलेल्या विजेच्या खेळखंडोब्याविषयी विचारणा करायला गेलेले शेकापचे कार्यकर्ते विजय पाटील व सोमनाथ म्हात्रे यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. या घटनेचा निषेध म्हणून आजचा हा मोर्चा काढण्यात आला होता.
या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. होणा:या गैरसोयीविषयी विचारणा करायला गेलेल्या लोकप्रतिनिधींवर महावितरणकडून खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप यावेळी मोर्चेक:यांनी केला. तसेच याप्रकरणी महावितरणचे कनिष्ठ अभियंता एस.वाय.पाटील यांना तत्काळ निलंबित करा, अशी मागणी करण्यात आली. शेकापचे जवळजवळ हजारो महिला, पुरुष कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. सेक्टर 12 येथील शिवमंदिरापासून मोर्चाला सुरूवात झाली. यात नागरिकांसह परिसरातील व्यापारीही मोठय़ासंख्येने सहभागी झाले होते. शेकापचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपकार्यकारी अभियंता राठोड यांची भेट घेवून आपला निषेध नोंदविला. तसेच कनिष्ठ अभियंता पाटील यांच्यावर नियमाने कारवाई करण्याची मागणी केली. फणसवाडी परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने सकारात्मक प्रयत्न केले जातील. तसेच कनिष्ठ अभियंता पाटील यांच्या बदलीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव येईर्पयत त्यांना प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आल्याची माहिती राठोड यांनी शिष्टमंडळाला दिली. दरम्यान, या शिष्टमंडळात शेकापचे काशिनाथ पाटील, जिल्हा परिषद सदस्य राम करावकर , खारघरच्या सरपंच वनिता पाटील, गुरुनाथ गायकर, सोमनाथ म्हात्ने , ज्ञानेश्वर पवार , विजय पाटील, विष्णू पाटील, संतोष तांबोळी, माजी उपसरपंच संतोष गायकर, किशोर ठाकूर आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)