मुंबई - यंदाच्या उन्हाळ्यात शनिवारी (26 मे) तब्बल 20,746 मेगावॉट विजेची उच्चांकी मागणी नोंदविण्यात आली आणि महावितरणनेही या मागणीएवढाच वीजपुरवठा केला. मुंबईसह राज्यात शनिवारी तब्बल 23987 मेगावॉट विजेची मागणी होती. राज्यात कोणत्याही ठिकाणी भारनियमन न करता विजेची ही मागणी पूर्ण करण्यात आली, हे उल्लेखनीय.
राज्यात सध्या उष्णतेची लाट असल्याने विजेच्या मागणीतही विक्रमी वाढ होत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात 23 एप्रिल रोजी मुंबईवगळून राज्यात महावितरणने 20,340 मेगावॉट विजेच्या उच्चांकी मागणीएवढाच यशस्वी पुरवठा केला होता. त्यानंतर आज राज्यातील महावितरणच्या कार्यक्षेत्रात तब्बल 20,746 मेगावॉॅट विजेची मागणी नोंदविण्यात आली. 23 एप्रिलच्या तुलनेत सुमारे 400 मेगावॉटने विजेची मागणी वाढली तरी महावितरणकडून विजेची उपलब्धता व तांत्रिक व्यवस्थापनाचे योग्य नियोजन करून ही यंदाची विक्रमी मागणी यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. यासोबतच आज मुंबईची मागणीसुद्धा 3241 मेगावॉट नोंदविण्यात आली. त्यासह राज्यात एकूण 23,987 मेगावॉट विजेच्या मागणीएवढाच पुरवठा करण्यात आला आहे. राज्यातील विजेची उपलब्धता व तेवढाच पुरवठा याचा हा यावर्षीचा विक्रम आहे.
राज्यात वितरण व पारेषण यंत्रणेचे मोठ्या सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात येत आहे. तसेच या यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामे नियमितपणे करण्यात येत आहेत. त्यामुळे विजेची मागणी वाढत असतानाही यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत राज्याच्या कोणत्याही भागात वीजटंचाईमुळे भारनियमन करण्याची गरज उद्भवलेली नाही. तसेच सर्वाधिक विजेच्या मागणीएवढाच पुरवठा करणे महावितरणला शक्य झाले आहे. सध्या महावितरणला महानिर्मिती कंपनीकडून सुमारे 6700 मेगावॉट केंद्रीय प्रकल्प तसेच दीर्घ व लघु मुदतीच्या कराराद्वारे सुमारे 10,200 मेगावॉट आणि इतर विविध स्त्रोतांकडून सुमारे 3900 मेगावॉट वीज उपलब्ध होत आहे.