मुंबई : कोरोना दाखल होण्यापूर्वीपासूनच सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांची अवस्था चांगली नव्हती. कोरोनामुळे त्यांचे संकट अधिक गहिरे झाले आहे. एमएसएमईसाठी भांडवल हेच आॅक्सिजन आहे. केंद्र सरकारने बुधवारी जाहीर केलेल्या पॅकेजच्या माध्यमातून हा आॅक्सिजन त्यांना नक्कीच मिळेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकमत माध्यम समूहाच्या वेबिनारमध्ये बोलताना व्यक्त केला.घोड्याला आपण पाण्यापर्यंत नेऊ शकतो, परंतु शेवटी पाणी त्यालाच प्यायचे आहे, अशा शब्दांत आलेल्या संधीचा फायदा करून घेण्याचे आवाहनही गडकरी यांनी उद्योजकांना केले. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या धर्तीवर एमएसएमईसाठी एक्स्चेंज उभारणीचे प्रयत्न सुरू आहेत. २० एमएसएमर्इंनी त्यासाठी नोंदणी केली आहे. नोंदणीसाठी ट्रॅक रेकॉर्ड चांगला हवा. इक्विटीच्या माध्यमातून सरकार त्यांच्यासाठी काही टक्के भांडवलउभे करू शकेल. त्यांचा शेअर वधारला की सरकारचाही फायदा होईल. आज ५० हजार कोटी गुंतविले; तर पाच वर्षांत पाच लाख कोटी व्हायला वेळ लागणार नाही. तसेच, उद्योगांच्या पतपुरवठ्यासाठी बँकेला पर्यायी व्यवस्था उभी करावी लागेल, असे मत मांडतानाच नव्या पॅकेजमधून तो उद्देशही सफल होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सिंचनाचे एक लाख कोटी अडवलेमहाराष्ट्रातील सिंचन क्षमता ५२ टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी १ लाख कोटी रुपये खर्च करण्याची योजना होती. मात्र, राज्यातीलअर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यात कायदेशीर प्रश्न उपस्थित करून खो घातल्याने ही कामेहोऊ शकली नाहीत, अशी खंत गडकरी यांनी व्यक्त केली. तसेच राज्याची विद्यमान सिंचन क्षमता१९ वरून ५२ टक्क्यांवर जात नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत, असेही ते म्हणाले....तर धारावीचीकोंडी फुटेल !मुंबईतील धारावीसह देशातील जवळपास सर्वच प्रमुख शहरांमध्ये चर्मकार बांधव अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहतात. त्यांच्यासाठी जगातील सर्वात मोठे लेदर क्लस्टर उभारण्याची योजना आहे. त्यामुळे हा परिसर कोंडीमुक्त होईल आणि चांगल्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाल्याने त्यांचे जीवनमानही उंचावेल, असे गडकरी म्हणाले.