एमएसआरडीसी उभारणार वडाळ्याचे जीएसटी भवन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 05:52 PM2020-11-04T17:52:18+5:302020-11-04T17:52:50+5:30
GST building at Wadala : २१ मजली भव्य इमारत ; ११ मजले जीएसटी कार्यालयासाठी
प्रशिक्षण केंद्र , आँडिटोरीयम आणि होस्टेलही उभारणार
मुंबई : वडाळा येथील जीएसटी भवन उभारणीची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारने राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) दिली आहे. या इमारतीत ११ मजले जीएसटी कार्यालयांसाठी दिले जाणार असून तीन मजल्यांवरून राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार चालणार आहे. त्याशिवाय या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र, भव्य आँडिटोरीयम आणि होस्टेलची सुविधासुध्दा उभारली जाणार आहे.
वडाळा येथील सीएस ६ आणि ८ या भूखंडाची निवड जीएसटी भवनाच्या इमारतीसाठी करण्यात आली आहे. ४५० मीटर लांब आणि ३५ मीटर रुंद असलेल्या या भूखंडावर ही २१ मजली भव्य इमारत उभरली जाणार आहे. तिथले वापरण्याजोगे एकूण क्षेत्रफळ २ लाख ७३ हजार चौरस फुट असेल. वाहनांसाठी इमारतीमध्ये भुयारी आणि दोन मजल्यांपर्यंत पोडियम पार्किंग असेल. तीन मजले सार्वजनिक बांधकाम विभागासाठी दिले जातील. त्यानंतरच्या तीन मजल्यांवर सामाईक सुविधा असतील. पुढील ११ मजले महाराष्ट्राचा कारभार हाकणा-या जीएसटीच्या मध्यवर्ती कार्यालयासाठी दिले जाणार असल्याची माहिती एमएसआरडीसीच्या अधिका-यांनी दिली. हे कार्यालय शिवडी – चेंबूर लिंक, मोनो रेल्वे आणि मेट्रो चार मार्गिकेने जोडले असेल. मेट्रो चार मार्गिकेवर जीएसटी भवन हे स्टेशनही असल्याची माहिती अधिका-यांनी दिली.
मार्च २०२३ पर्यंत काम पूर्ण करण्याचे टार्गेट
मेटर मँनेजमेंट कन्सल्टंट आणि पी. के. दास असोसिएट्स यांची नियुक्ती प्रकल्पाचे व्यवस्थापन सल्लागार म्हणून झालेली आहे. प्रकल्पाचे सविस्तर आराखडे तयार करणे आणि प्रत्यक्ष कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. हे काम करण्यासाठी कंत्राटदाराची निवड करण्यापूर्वी प्री बिड क्वालिफिकेशनची अट घालण्यात आली आहे. सुरवातीला पात्र ठरणा-या कंपन्यांची निवड केली जाईल. त्यानंतर त्यांना प्रत्यक्ष निविदा प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी देत लघुत्तम निविदाकाराची निवड केली जाणार आहे. मार्च, २०२१ पर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल आणि पुढील दोन वर्षांत ही इमारत पूर्ण केली जाईल असा एमएसआरडीसीचा दावा आहे.