Join us  

लालपरीला ज्येष्ठ नागरिकांची पसंती कायम, एका महिन्यात ५५ लाखांहून अधिक ज्येष्ठांचा एसटी मोफत प्रवास

By नितीन जगताप | Published: September 29, 2022 6:15 PM

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरीलनागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून  मोफत प्रवास करण्याची  घोषणा

मुंबई :  

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरीलनागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून  मोफत प्रवास करण्याची  घोषणा मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानंतर एसटी प्रवासाला एक महिन्यात  ज्येष्ठांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळू लागला आहे.  २६ ऑगस्ट २०२२  ते२६ सप्टेंबर  २०२२ दरम्यान राज्यभरातून  ५४ लाख ५८ हजारांहून अधिक ज्येष्ठनागरिकांनी एसटीतून मोफत प्रवासाचा लाभ घेतला आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. 

७५वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवास तर ६५ ते ७५वर्षा दरम्यानच्या नागरिकांनाही सर्व सेवांमधून ५० टक्के सवलतीमध्ये प्रवास करतायेईल, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात केली होती. २५ ऑगस्ट, २०२२ रोजी योजनेचा शुभारंभ झाला होता.त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचा २६ ऑगस्ट पासून मोफत प्रवासाला सुरुवात झाली होती.  एसटी महामंडळाने या योजनेला 'अमृतज्येष्ठ नागरिक' हे नाव दिले असून या योजनेतंर्गत ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत कुठेही मोफत प्रवास करता येणार आहे.