Join us

काेट्यधीश एसटी; कर्मचारी उपाशी! भत्ते सोडा, वेळेवर पगारही नाही; अनुदानासाठी सरकारपुढे हात पसरण्याची वेळ

By विलास गावंडे | Published: November 07, 2022 6:23 AM

कोरोना आणि कर्मचाऱ्यांचा पाच महिन्यांचा संप, यामुळे एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती आणखी नाजूक झाली.

यवतमाळ :

कोरोना आणि कर्मचाऱ्यांचा पाच महिन्यांचा संप, यामुळे एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती आणखी नाजूक झाली. याचा सर्वाधिक मार महामंडळातील ९० हजारांवर कर्मचाऱ्यांना बसला. त्यांना नियमित वेतनही मिळेनासे झाले आहे, विविध भत्तेही वेळेवर मिळत नाहीत. मात्र, या दिवाळीत एसटीवर ‘लक्ष्मी’ प्रसन्न झाली. ११ दिवसांत तब्बल २७५ काेटी रुपये उत्पन्न झाले. यातून थकीत रक्कम मिळावी, अशी अपेक्षा कर्मचारी व्यक्त करीत आहेत. 

डिझेल आणि साहित्याच्या किमती वाढल्या आहेत. प्राप्त उत्पन्नातून हा खर्च काही प्रमाणात भागविला जातो. मात्र, वेतनासाठी सरकारपुढे हात पसरावे लागतात. स्वत: वेतन खर्च भागवता येईल, इतके उत्पन्न येत नाही. नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सवलत योजनांची रक्कम शासनाकडून वेळेवर मिळत नाही. कोरोनाच्या काळापासून आतापर्यंत २ हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम महामंडळाला मिळाली. यातून कर्मचाऱ्यांचे पगार होत गेले, पण थकबाकीसाठी ताटकळतच ठेवले जात आहे. सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे लाभ तातडीने दिले जात नाही. 

खासगीचे मेंटेनन्स कंत्राटदाराकडे1. महामंडळाच्या बसेसना आगी लागण्याच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. ऐन दिवाळीच्या काळात घडलेल्या तीन घटनांमुळे हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बसेसचे मेंटेनन्स योग्यरीत्या होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.2. महामंडळाच्या सेवेत असलेल्या खासगी शिवशाही बसेसच्या मेंटेनन्सची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांकडे आहे. वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्यानेही बस पेटते. याकडे दुर्लक्ष होत असल्याची बाबही पुढे आली आहे. बहुतांश वेळा केवळ हवा चेक करणे, ऑइल लेव्हल पाहणे एवढीच कामे केली जातात. 

महागाई भत्तावाढीची फाइल सरकारकडे महागाई भत्तावाढीची फाइल सरकारकडे तीन महिन्यांपूर्वी पाठविण्यात आली. त्यावर अजून तरी निर्णय झालेला नाही. ही फाइल मंजूर झाल्यास दिवाळीत मिळालेल्या वाढीव उत्पन्नातून थकीत रक्कम मिळण्याची आशा कर्मचाऱ्यांना आहे.

सेवानिवृत्त ११० कर्मचारी  लाभाच्या प्रतीक्षेत दिवंगतशिल्लक रजेसह इतर प्रकारची थकबाकी मिळण्यास दीर्घ कालावधी लागतो. या रकमा मिळण्याच्या प्रतीक्षेत ११० सेवानिवृत्त कर्मचारी दिवंगत झाले, अशी माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली. 

२२ कोटी कोरोनापूर्वी मिळणारे दररोजचे उत्पन्न१५-१६ कोटी सध्याचे उत्पन्न३७० कोटी कर्मचारी वेतन खर्च२१५ कोटी सेवानिवृत्तांची थकबाकी१५-१८ कोटी महागाई भत्ता थकीत 

कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित होत आहे. त्यांची जुनी देणी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एसटी बसेसना आग लागल्याप्रकरणी समिती गठीत करण्यात आली आहे. अहवालानंतर कारवाई केली जाईल. पुन्हा अशा घटना घडू नये, यासाठी उपाययोजना सुचविण्याचे समितीला सुचविले आहे. - शेखर चन्ने, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय     संचालक, एसटी महामंडळ

टॅग्स :एसटी संप