Join us

ST Strike: एसटी संपावर पगारवाढीचा तोडगा! अनिल परबांनी दिली अंतरिम पगारवाढीची ऑफर, उद्या पुन्हा बैठक 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 9:46 PM

ST Strike: एसटी चालक-वाहक आणि कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी तोडगा काढण्यासाठी अंतरिम पगारवाढीची ऑफर दिली आहे.

मुंबई

एसटी चालक-वाहक आणि कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी तोडगा काढण्यासाठी अंतरिम पगारवाढीची ऑफर दिली आहे. एसटी महामंडळाच्या राज्य शासनात विलिनीकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना अंतरिम पगारवाढ देण्याचा पर्याय देण्यात आला असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली आहे. उद्या सकाळी पुन्हा एकदा याबाबत बैठक होणार असून त्यावर निर्णय घेण्यात येईल, असंही परब म्हणाले. 

अंतरिम पगारवाढीच्या सरकारच्या निर्णयावर आता एसटी कर्मचारी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान संपावर आता तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झालेले भाजपा नेते गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि एसटीचे प्रतिनिधी यांच्यातही बैठक झाली. यानंतर अनिल परब यांनी प्रसारमाध्यांमसमोर येत संपूर्ण माहिती दिली. 

"न्यायालयानं विलीनीकरणाचा विचार करण्यासाठी समिती नेमली आहे. समितीचा जो काही अहवाल येईल तो आम्ही मान्य करू, पण तोपर्यंत संप चालू राहू शकत नाही. त्यामुळे कामगारांना अंतरिम पगारवाढ देण्याचा पर्याय दिला आहे. याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून आम्ही ऑफर दिली आहे. आता उद्या सकाळी ११ वाजता यासंदर्भात पुन्हा बैठक होणार आहे", असं अनिल परब म्हणाले. 

विलीनीकरणानंतरही पगारवाढ दिली जाईल"आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेसमोर दोन-तीन पर्याय दिले आहेत. अंतरिम वेतनवाढ देऊ शकतो. तसंच वाढ दिल्यानंतर समितीन एसटीच्या विलीनीकरणाचा निर्णय दिला तर विलीनीकरणासाठी देखील सरकार तयार आहे. त्यानंतरही पगारवाढ दिली जाईल", असंही परब यांनी यावेळी सांगितलं. 

एसटी कर्मचाऱ्यांनी आता अधिक ताणू नये. सरकार दोन पावलं पुढं यायला तयार आहे. तुम्ही दोन पावलं मागे या. चर्चेनं मार्ग काढू. कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा. सरकारलाही काही मर्यादा आहेत. कोर्टाच्या आदेशाचं आम्ही उल्लंघन करू शकत नाही. आपण नक्कीच तोडगा काढून पुढे जाऊ, असं आवाहन अनिल परब यांनी केलं. 

टॅग्स :एसटी संपअनिल परब