Join us  

दूरसंचार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठीच एमटीएनएल-बीएसएनएल एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 4:10 AM

मुंबई : येत्या १ सप्टेंबरपासून मुंबईतील एमटीएनएलची मोबाइलसेवा बीएसएनएल हाताळणार आहे. ग्राहक सेवा आणि देखभाल दुरुस्तीची कामेही बीएसएनएलमार्फतच केली ...

मुंबई : येत्या १ सप्टेंबरपासून मुंबईतील एमटीएनएलची मोबाइलसेवा बीएसएनएल हाताळणार आहे. ग्राहक सेवा आणि देखभाल दुरुस्तीची कामेही बीएसएनएलमार्फतच केली जातील. पण अचानक या दोन्ही कंपन्या एकत्र का आल्या, त्यामागचा उद्देश काय, कर्मचाऱ्यांचे काय होणार, या आणि अशा अनेक मुद्द्यांवर ‘ऑल इंडिया बीएसएनएल एक्झिक्युटिव्ह असोसिएशन’चे साहाय्यक सरचिटणीस विष्णू पवार यांच्याशी साधलेला संवाद.

............

एमटीएनएल-बीएसएनएलच्या विलीनीकरणाची ही पहिली पायरी आहे का?

अजिबात नाही. या दोन्ही कंपन्या सरकारी असल्या तरी त्यांचे विलीनीकरण करणे तितकेसे सोपे नाही. कारण, दोघांचे मनुष्यबळ प्रशासन वेगळे आहे. दोन्ही कंपन्यांचे कार्यालयीन कर्मचारी, अभियांत्रिकी- देखभाल दुरुस्ती विभागातील कर्मचाऱ्यांच्या भरतीचे नियम वेगवेगळे आहेत. त्यामुळे विलीनीकरण करायचे झाल्यास बऱ्याच किचकट प्रक्रियांना सामोरे जावे लागेल. सध्यातरी केवळ सेवा चालवायला घेण्याचा प्रस्ताव आहे.

....

नेमकी योजना काय आहे? तिचा उद्देश काय?

एमटीएनएलच्या ऑपरेशन्सची जबाबदारी बीएसएनएलकडे देणारी ही योजना आहे. सरकारी दूरसंचार कंपन्यांचे बळकटीकरण करण्याचा उद्देश त्यामागे आहे. त्यातून राजकीय किंवा अन्य मथितार्थ काढणे योग्य होणार नाही. खासगी ऑपरेटर्सना बँडविड्थ आम्ही पुरवतो. आमच्या पायाभूत सुविधा ते भाड्याने घेतात. म्हणजेच ते आमच्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे सेवेत सुधारणा करून त्यांना टक्कर देण्याचा मानस आहे.

................

याचा ग्राहकांना फायदा काय?

ग्राहकांना १०० टक्के फायदा होईल, अशा उपाययोजना आखणे हा सरकारी दूरसंचार कंपन्यांच्या स्थापनेमागील प्रमुख उद्देश आहे. या एकत्रीकरणामुळे सेवेत सुधारणा होण्याबरोबरच जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचता येईल. खासगी कंपन्यांच्या तुलनेत आमची सेवा आता खूपच सुधारली आहे. लोकांना योग्य दरात सेवा पोहोचावी, हे या योजनेमागील मुख्य उद्दिष्ट आहे.

...........

कर्मचारी, पायाभूत सुविधाही हस्तांतरित होणार का?

नाही. दोन्ही कंपन्यांचे कर्मचारी जेथे गरज पडेल तेथे एकत्रितपणे काम करतील. पण, मुख्य ऑपरेशनची जबाबदारी बीएसएनएलकडे असेल. दोघांकडेही मोक्याच्या ठिकाणांवर पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. मनुष्यबळाअभावी देखभाल होत नसल्याने सेवेवर परिणाम झाला होता. पण, आता ग्राहकवृद्धीसाठी एकत्रित प्रयत्न केले जातील.

........

(मुलाखत – सुहास शेलार)