Join us

एमटीएनएल केबल तुटल्याचा सीएसएमटी परिसराला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 1:39 AM

इंटरनेट व फोन सेवा बंद : पालिका मुख्यालयासह अनेक कार्यालयांना फटका

मुंबई : मेट्रो तीन रेल्वे प्रकल्पाच्या कामाचा फटका सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसराला बसला. या प्रकल्पाच्या खोदकामामुळे एमटीएनएलची केबल तुटल्यामुळे या परिसरातील सर्व शासकीय व खासगी कार्यालयांमधील इंटरनेट व फोन सेवा बंद पडली होती. याचा मोठा फटका पालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला बसला.

आझाद मैदान येथे मेट्रो प्रकल्प तीनचे काम सुरू आहे. या वेळी खोदकाम करताना चारशे केव्हीच्या केबलला फटका बसला. यामुळे सकाळपासूनच एमटीएनएल कंपनीची या परिसरातील इंटरनेट व फोन सेवा ठप्प झाली. या परिसरात अनेक शासकीय व खासगी कार्यालये आहेत. तसेच महापालिका मुख्यालयही असून येथील दुसऱ्या मजल्यावरील आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे काम यामुळे मंदावले.

आज दिवसभर मुंबईत मुसळधार पाऊस सुरू होता. या काळात मदत मिळावी यासाठी नागरिक पालिका नियंत्रण कक्षाला फोन करतात. मात्र फोन बंद असल्याने नागरिकांची गैरसोय झाली. त्यामुळे मुसळधार पावसात खबरदारी म्हणून आपत्कालीन नियंत्रण कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोबाइलवरील इंटरनेट सेवेचा वापर करून काम करावे लागले, असे एका अधिकाºयाने सांगितले. उद्या सकाळपर्यंत केबल दुरुस्त होणे अपेक्षित आहे.बिघाड मंगळवारी होणार दुरुस्त!एमटीएनएलच्या वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले, सीएसएमटी परिसरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे एमटीएनएलच्या केबलचे नुकसान झाले आहे. नेमका बिघाड अद्याप सापडलेला नाही. मेट्रोच्या कार्यक्षेत्रात बिघाड झालेला असल्याने मेट्रोकडून खोदकाम करून देणे गरजेचे आहे, मात्र सायंकाळी साडेसातपर्यंत मेट्रोकडून याबाबत कोणतेही कार्य करण्यात आले नव्हते. बिघाड झालेली फायबर केबल मिळाल्यावर दोन तासांत बिघाड दूर करता येईल, मात्र मेट्रोकडून हे काम होईपर्यंत एमटीएनएलला काही करता येणार नाही, अशा शब्दांत त्यांनी या प्रकाराचे खापर मेट्रोवर फोडले. त्यामुळे मंगळवारी हे दुरुस्ती काम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.