MTNL अध्यक्षांची एमटीएनएल इमारतीला भेट, पश्चिमेकडील वाऱ्यामुळे जीव वाचल्याची 'आपबिती'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 04:23 PM2019-07-23T16:23:36+5:302019-07-23T16:28:15+5:30
आगीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यापूर्वी पुरवार यांनी लोकमत शी संवाद साधला
खलील गिरकर
मुंबई : वांद्रे पश्चिम येथे एमटीएनएल इमारतीला सोमवारी भीषण आग लागली होती. या घटनास्थळाला एमटीएनएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पी. के. पुरवार यांची भेट देऊन आगीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी केली. पश्चिम 1 विभागाच्या महाव्यवस्थापक नीता अस्पातही यावेळी उपस्थित होत्या.
आगीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यापूर्वी पुरवार यांनी लोकमत शी संवाद साधला. प्रत्यक्ष पाहणी केल्यावर नेमके किती नुकसान झाले आहे याचा अंदाज येईल व त्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी किती कालावधी लागेल याची माहिती देता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. आगीची घटना अत्यंत दुर्देवी असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. पूर्ण क्षमतेने कार्य करुन या परिस्थितीतून बाहेर निघण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाव्यवस्थापक नीता असपात म्हणाल्या, कालच्या आगीच्या घटनेमुळे कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे. कर्मचारी कर्तव्याला प्राधान्य देऊन कामावर आले आहेत मात्र इमारतीमध्ये प्रवेश करण्यैस बंदी असल्याने कर्मचारी प्रवेशद्वाराजवळ उभे आहेत. नेमके किती नुकसान झाले हे पाहून पुढील कार्यवाही करण्यात येईल असे महाव्यवस्थापकांनी सांगितले. महानगर टेलिफोन निगम कामगार संघाचे सरचिटणीस दिलीप जाधव यांनीदेखील इमारतीमध्ये जावून परिस्थितीची पाहणी केली.
इमारतीमध्ये अग्निशमन दलातर्फे कुलिंग ऑपरेशन सुरु असून हे कुलिंग ऑपरेशन मंगळवारी रात्री पर्यंत चालेल असे सांगण्यात आले. मंगळवारी पूर्ण इमारतीत काळोख, सर्वत्र पाणी व जळाल्याचा कुबट वास पसरलेला होता. भिंती आगीमुळे गरम झाल्या होत्या त्या दुसऱ्या दिवशी देखील त्यामधून उष्ण हवा बाहेर पडत होती. आग लागली तेव्हा कँटीनमध्ये चहा पिणाऱ्या व नाष्टा करणाऱ्यांनी चहाचे कप, नाष्टाची प्लेट तशीच सोडून पळ काढला त्यामुळे त्यांचा जीव वाचू शकला. आगीमुळे मोठ्या प्रमाणात दूर झाल्याने धुरात गुदमरुन दोन कबुतरे देखील मृत्युमुखी पडली.
पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे जीव वाचला
कालच्या दुर्घटनेत चौथ्या मजल्यावर अडकलेल्या चार कर्मचाऱ्यांनी आगीतून वाचण्यासाठी पश्चिमेकडील खिडकीचा आश्रय घेतला. त्यांच्या सुदैवाने पश्चिमेकडून पूर्वेकडे वाऱ्याचा प्रवाह असल्याने संपूर्ण दूर पुढे जात होता उलट दिशेने वारा वाहिला असता तर या कर्मचाऱ्यांना गुदमरावे लागण्याची भीती होती. पाऊण तासानंतर अग्निशमन दलाने खाली उतरल्यावर जीवात जीव आला तोपर्यंत मृत्यु समोर दिसत असल्याची प्रति क्रिया त्यांनी व्यक्त केली.