Join us

एमटीएनएलची मोबाइल सेवा आता बीएसएनएलच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईतील एमटीएनएलची मोबाइलसेवा आता बीएसएनएल हाताळणार आहे. १ सप्टेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईतील एमटीएनएलची मोबाइलसेवा आता बीएसएनएल हाताळणार आहे. १ सप्टेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून, ग्राहक सेवा आणि देखभाल दुरुस्तीचे कामही बीएसएनएलमार्फत केले जाणार आहे. महसूल वाढीसह नवे ग्राहक जोडण्याचा यामागे मानस आहे.

स्वेच्छानिवृत्ती योजनेनेनंतर दिमतीला उरलेले अत्यल्प कर्मचारी, पायाभूत सुविधांचा वापरण्यात आलेले अपयश, सेवा आणि गुणवत्तेचा खालावलेला दर्जा, तसेच खासगी दूरसंचार कंपन्यांच्या वाढत्या प्राबल्यामुळे गेल्या काही वर्षांत एमटीएनएलच्या ग्राहकसंख्येत मोठी घट झाली आहे. त्यामुळे एमटीएनएलवरील भार हलका करून तो बीएसएनएलकडे देण्याची योजना प्रस्तावाधीन होती. १ एप्रिलपासून एमटीएनएलची दिल्लीतील मोबाइलसेवा बीएसएनएलकडे हस्तांतरित करण्यात आली. आता मुंबईसाठी तशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला.

मुंबईत एमटीएनएलकडे १५ लाख लॅण्डलाइन ग्राहक असून, मोबाइल ग्राहकांची संख्या केवळ ५ लाख इतकी आहे. एमटीएनएलच्या मोबाइल सेवेच्या देखभालीसाठी बीएसएनएलने आउटसोर्स एजन्सी म्हणून काम करण्यास संयुक्त समितीने सहमती दर्शविली आहे. सेवेवरील खर्च, परवाना आणि स्पेक्ट्रम शुल्क, जागेचे भाडे, वीज देयके, कर्मचाऱ्यांचे वेतन आदींसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.

.................

लॅण्डलाइन सेवा एमटीएनएलकडेच

मोबाइल सेवा बीएसएनएलकडे दिली असली तरी लॅण्डलाइन सेवा एमटीएनएलकडे राहणार आहे. त्यात केबल इंटरनेटचाही समावेश आहे. मोबाइल ऑपरेशन्स हाताळताना बीएसएनएल कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारणार नाही. पायाभूत सुविधा किंवा अन्य मालमत्तांचा मालकीहक्क एमटीएनएलकडे कायम राहील. जोपर्यंत एमटीएनएल अस्तित्वात आहे तोपर्यंत संपूर्ण हस्तांतरण केले जाणार नसल्याची माहिती महानगर टेलिफोन निगम लिमिटेडशी संबंधित एका अधिकाऱ्याने दिली.

……….

एमटीएनएलच्या मोबाइल सेवेच्या ऑपरेशन्सची जबाबदारी बीएसएनएलकडे देण्याचा निर्णय झाला आहे. ‘डीओटी’च्या कंपन्या असल्यामुळे दोघांना वेगवेगळे लायसन्स घ्यायची गरज नाही. सरकारी दूरसंचार कंपन्यांना बळ देण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जाणार आहे. ऑपरेशन्सची धुरा त्यांच्याकडे असली तरी आमचे कर्मचारीही सहकार्य करतील.

-नरेंद्र गजरे, मुख्य प्रवक्ते, एमटीएनएल, मुंबई

...............

कारण काय?

- बीएसएनएलकडे ४-जी सेवा उपलब्ध आहे, तर ५-जीसाठी चाचपणी सुरू आहे. दुरावलेल्या एमटीएनएल ग्राहकांना या दोन्ही सेवांच्या मदतीने परत आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

- खासगी दूरसंचार कंपन्यांची सेवा तुलनेने महाग आहे. त्यामुळे स्वस्तात टॅरिफ प्लॅन देऊन स्पर्धेत उतरण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

- गुणवत्तापूर्ण सेवा माफक दरात मिळाल्यास ग्राहकसंख्या वाढून महसुलात भरघोस वाढ होईल, असा विश्वास व्यवस्थापनाला आहे.