मुंबई : एमटीएनएल कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन रखडल्याने कर्मचाऱ्यांमधून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. एमटीएनएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पी.के. पुरवार यांनी एप्रिल महिन्याचे वेतन वेळेवर होईल, अशी ग्वाही दिलेली असतानाही वेतन रखडल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. एप्रिल महिन्याचे वेतन कर्मचाºयांना ४ मे रोजी मिळेल, असे परिपत्रक प्रशासनातर्फे काढण्यात आले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने एमटीएनएलच्या कर्मचाºयांना वेतनाबाबत त्रास सहन करावा लागत आहे. या प्रश्नी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना आखाव्यात व कर्मचाºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. दर महिन्याला वेतनाचा तिढा निर्माण होत असूनही प्रशासनाकडून त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
युनायटेड फोरमचे प्रकाश तावडे यांनी सरकार व प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्यानेच असे प्रकार घडत असल्याचा आरोप केला आहे. वेळेवर वेतन मिळत नसल्याने कर्मचाºयांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे, त्यामुळे हा प्रश्न त्वरित सोडवण्याची मागणीही त्यांनी केली. तर, महानगर टेलिफोन निगम कामगार संघाचे सरचिटणीस दिलीप जाधव म्हणाले की, सातत्याने असा गोंधळ होत असल्याने हा प्रकार बंद करण्यासाठी व दर महिन्याला नियमितपणे वेतन होण्यासाठी उपाययोजना आखण्याची गरज आहे.