Join us

एमटीएनएलची सेवा कोलमडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2021 4:06 AM

ग्राहक संतप्त; २० दिवसांनंतरही तक्रारींचा निपटारा नाहीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे विस्कळीत झालेली एमटीएनएलची सेवा २० ...

ग्राहक संतप्त; २० दिवसांनंतरही तक्रारींचा निपटारा नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे विस्कळीत झालेली एमटीएनएलची सेवा २० दिवसांनंतरही पूर्ववत झालेली नाही. त्यामुळे वरळी परिसरातील शेकडो ग्राहक त्रस्त आहेत. वारंवार तक्रारी करून, कार्यालयात हेलपाटे मारूनही दखल घेतली जात नसल्याने, एमटीएनएलच्या भोंगळ कारभाराविरोधात त्यांनी संताप व्यक्त केला.

चक्रीवादळामुळे एमटीएनएलसह अन्य सेवादात्यांचेही मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने, केबल तुटल्या, मुसळधार पावसामुळे तारांना पाणी लागून सेवा विस्कळीत झाली. खासगी सेवादारांनी अवघ्या दोन-तीन दिवसांत दुरुस्तीचे काम पूर्ण करून तक्रारींचा निपटारा लावला; परंतु एमटीएनएलचे काम मात्र कासवगतीने सुरू आहे. याविरोधात कितीही आवाज उठवला, तरी अधिकारी कान बंद करून खुर्च्या गरम करण्याचे काम करीत असल्याची संतप्त प्रतिक्रिया वरळी नाका परिसरातील ग्राहकांनी दिली.

खासगी दूरसंचार कंपन्यांशी स्पर्धा करण्यात सपशेल अपयशी ठरल्याने एमटीएनएल तोट्यात गेली. त्यामुळे जवळपास ९० टक्के कमचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. त्याचा परिणाम सेवेवर होत आहे. कर्मचाऱ्यांची तूट भरून काढण्यासाठी कॉन्ट्रॅक्टदारांच्या हातात सर्व तांत्रिक कारभार साेपविला आहे. त्यांनी अत्यल्प वेतनावर अकुशल कामगारांची भरती केली. त्यामुळे किचकट बिघाड दुरुस्त करण्यात ते असमर्थ ठरतात. वरिष्ठ अधिकारी याकडे कानाडोळा करीत असल्यामुळे कंत्राटदारांचे फावते, अशी माहिती एमटीएनएलमधील एका अधिकाऱ्याने दिली.

* जबाबदारी झटकण्याचे प्रकार

- वरळी नाका परिसरातील लॅण्डलाइनसेवा गेल्या २० दिवसांपासून बंद आहे. येथील ग्राहकांनी १७ मे रोजी तक्रार दाखल केली, परंतु आजपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेले नाही.

- वरळी येथील एमटीएनएल कार्यालयाचे प्रमुख एस. यादव यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता, त्यांनी जबाबदारी ढकलली. कंत्राटदाराला सेवा दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्याउपर आम्ही काहीही करू शकत नाही. तुम्ही त्यांच्याशीच संपर्क करा, असे सांगण्यात आले.

- कंत्राटदार फुरकान मुजावर यांनी आणखी ८ ते १५ दिवस लागतील, असे मोघम उत्तर दिले. त्यामुळे दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न ग्राहकांनी उपस्थित केला.

* रोज नवे कारण

एमटीएनएलने नेमलेल्या कंत्राटदाराकडून ग्राहकांना रोज नवनवी कारणे दिली जात आहेत. बिघाड नेमका कुठे झाला हेच कळत नाही, वायरमध्ये पाणी गेले आहे, मुख्य प्रवाह बंद पडल्याने अडथळे येत आहेत, अशी जंत्रीच ग्राहकांपुढे वाचली जात आहे; परंतु सेवा कधी सुरू होईल, हे सांगितले जात नाही. ‘सरकारी काम आणि दोन महिने थांब’ याची प्रचिती येत असल्याची नाराजी ग्राहकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

...............................................