स्नेहा मोरे - मुंबई : मुंबईतील केईएम, नायर व सायन या महापालिका रुग्णालयांतही म्युकाेरमायकोसिस रुग्णांची संख्या मागील कोरोना लाटेच्या तुलनेत वाढली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, या आजाराचे लवकर निदान झाल्यास उपचार करणे सुलभ होते. मात्र उशिरा झालेल्या निदानामुळे रुग्णांना धोका वाढतो. गेल्या दोन महिन्यात सायन रुग्णालयात १२ रुग्णांचा डोळा काढवा लागला आहे.नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले, नायरमध्ये मागील दोन आठवड्यात पोस्ट कोविड ओपीडीत म्युकाेरमायकोसिसचे २ ते ३ रुग्ण दिसून आले आहेत. मात्र या आजाराची लाट आली आहे, अशी स्थिती नाही. त्यामुळे कोणीही घाबरून न जाता कोरोनाचे उपचार घेताना व कोरोनामुक्तीनंतरही रुग्णांनी या आजाराच्या लक्षणांकडे लक्ष द्यावे आणि त्वरित तज्ज्ञांचा सल्ला, निदान आणि उपचारावर भर द्यावा.केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले, काेराेनाच्या पहिल्या लाटेत म्युकाेरमायकोसिसच्या ११ रुग्णांचे निदान झाले होते. दुसऱ्या लाटेत आतापर्यंत २५ रुग्णांचे निदान झाले आहे. त्यातील १६ रुग्ण सध्या उपचार प्रक्रियेत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मधुमेही रुग्णांना आणि उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना काळ्या बुरशीच्या संसर्गाचा सर्वाधिक धोका असू शकतो. स्टेरॉयडच्या वापरामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. आयसीयूमध्ये राहणे, गंभीर आजार आणि व्होरिकोनाझोल थेरपीमुळे संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे.
महिलेचे दाेन्ही डाेळे काढलेडोळ्यांतील संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचल्यावर हा आजार जीवघेणा ठरतो. अशा स्थितीत रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी सायन रुग्णालयातील एकूण ३० बाधितांपैकी ११ ते १२ रुग्णांचा एक डोळा काढण्यात आला. तर एका ४७ वर्षीय महिला रुग्णाचे दोन्ही डोळे काढण्यात आले, त्यानंतर तिचा जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. परंतु, ही स्थिती फार कमी वेळा उद्भवते. त्यामुळे पोस्ट कोरोना काळात रुग्णांनी नाक वा तोंडात काहीही प्राथमिक लक्षणे जाणवल्यास त्वरित कान-नाक-घसा तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे, अशी माहिती सायन रुग्णालयाच्या कान-नाक-घसा विभागाच्या प्रमुख डॉ. रेणुका ब्राडो यांनी दिली आहे.काय काळजी घ्याल?आयसीएमआरच्या मते, कोरोनातून बरे झालेल्या मधुमेही रुग्णांनी रक्तातील ग्लुकोज पातळी तपासणी सातत्याने करणे गरजेचे आहे. स्टेरॉयड घेताना, योग्य प्रमाण व कालावधी लक्षात ठेवायला हवा. रुग्ण प्रतिजैविक व अँटिफंगल वापरत असेल तर काळजी घ्या. लक्षणे दिसल्यास त्वरित डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.
डोळ्यानंतर संसर्ग पोहोचतो मेंदूपर्यंतम्युकाेरमायकोसिस या आजाराच्या सुरुवातीला नाकातून पाणी येणे, त्यातून थोडसे रक्त येणे, जबड्याच्या आत संवेदना न जाणवणे, ही लक्षणे आढळतात. मात्र त्यावेळेस रुग्ण तपासणीस येत नाही. हा संसर्ग ज्यावेळेस डोळ्यापर्यंत पोहोचतो, त्यावेळेस रुग्ण रुग्णालयात उपचारांकरिता येतात, तोपर्यंत उशीर झालेला असतो. या स्थितीत रुग्ण असल्यास शस्त्रक्रिया करून बाधित त्वचा काढून टाकावी लागते, त्यानंतर ६ आठवडे इंजेक्शन द्यावे लागते, असे तज्ज्ञांनी सांगितले.