मुंबई : महिला रुग्णांच्या तुलनेत पुरुष रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव अधिक आढळल्याचे दिसून आले आहे. देशभरातील चार वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या ‘म्युकरमायकोसिस इन कोविड-१९-अ सिस्टमेटिक रिव्ह्यू ऑफ केसेस रिपोर्टेड वर्ल्डवाइड इन इंडिया’ या अभ्यास अहवालातून हे समोर आले आहे.राष्ट्रीय पातळीवरील या अभ्यासाकरिता देशभरातील १०१ रुग्णांचा अभ्यास करण्यात आला आहे. १०१ रुग्णांच्या अहवालात ७९ पुरुष रुग्ण असल्याचे दिसून आले. त्यात १०१ पैकी ८३ रुग्णांच्या शरीरात साखरेची वाढलेली पातळी हा या आजारासाठी धोका ठरल्याचे निरीक्षण आढळून आले. हा अभ्यास अहवाल डॉ. अवदेश कुमार सिंग, डॉ. रितू सिंग, डॉ. शशांक जोशी आणि डॉ. अनुप मिश्रा या तज्ज्ञांनी एकत्रितरीत्या केला आहे. या अभ्यास अहवालात ८२ भारतीय रुग्ण आणि ९ अमेरिकेतील, तर तीन इराणमधील रुग्णांचा समावेश होता.राज्यात म्युकरमायकोसिसमुळे ९० रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे. १०१ रुग्णांपैकी ३१ रुग्णांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे, तर १०१ रुग्णांपैकी ६० म्युकरमायकोसिस रुग्णांमध्ये कोरोनाचे संक्रमणही आढळून आले आहे. त्याचप्रमाणे, ८३ रुग्णांना मधुमेह आणि ३ रुग्णांना कर्करोग असल्याचे दिसून आले.
‘रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे गरजेचे’डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, अहवालानुसार म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना मधुमेह असल्यास मृत्यूचा अधिक धोका संभावत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे म्युकरमायकोसिसचा धोका टाळण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवली पाहिजे. त्याचप्रमाणे, कोविड रुग्णांच्या उपचार प्रक्रियेतही स्टेरोइड्सचा अतिवापर करणे टाळायला हवे.
पांढऱ्या बुरशीला घाबरू नका - वैद्यकीय तज्ज्ञांची माहिती
राज्यासह मुंबईत कोरोनानंतर म्युकरमायकोसिस म्हणजेच काळ्या बुरशीच्या आजाराची दहशत निर्माण झाली आहे. याचा धोका टळत नाही, तोवर व्हाईट फंगस म्हणजे पांढऱ्या बुरशीचा त्रास असलेल्या रुग्णांविषयी माहिती समोर आली आहे. मात्र या पांढऱ्या बुरशीच्या आजाराला घाबरून जाण्याची गरज नसल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे.काळ्या बुरशीनंतर आता पांढऱ्या बुरशीची समस्या आढळल्याने सामान्यांच्या मनात घबराट पसरली आहे. याविषयी, वाॅकहार्ट रुग्णालयाचे औषध विभागाचे प्रमुख डॉ. बेहराम पार्डीवाला म्हणाले की, कोविडपूर्वीपासून पांढऱ्या बुरशीचा आजार अस्तित्वात आहे. पांढऱ्या बुरशीचा संसर्ग फुफ्फुसापर्यंत झाल्यास तो धोकादायक ठरू शकतो. तसेच मधुमेह असणाऱ्या रुग्णांमध्ये स्टेरॉईडच्या अतिवापरामुळे शरीरातील रोग प्रतिकारकशक्ती कमी झाल्याचे या संसर्गात दिसून येते. नख, त्वचा, पोट, मूत्रपिंड, मेंदू आणि तोंडाच्या आत याचा संसर्ग होऊ शकतो. या समस्यांचे लवकर निदान झाल्यास उपचारांती यावर नियंत्रण मिळविणे शक्य होते, त्यामुळे घाबरून न जाता प्राथमिक लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.तर डॉ. कृष्णा जैन यांनी म्हणाले, कमी प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींना हा संसर्ग होतो. जर रुग्ण पाणी किंवा इतर गोष्टींच्या संपर्कात आल्यास व त्याची स्वच्छता न झाल्यास हा संसर्ग होतो. या रुग्णांत कोविडसारखी लक्षणे दिसतात पण त्यांची चाचणी नकारात्मक येते. सीटी स्कॅन किंवा क्ष-किरणांनी त्याची तपासणी करतात. पांढऱ्या बुरशीचे रुग्ण बिहारमधील पाटणा येथे आढळले आहेत. काही दिवसांपूर्वी पाटण्यामध्ये ४ रुग्ण आढळले होते. दरम्यान, एक दिलासा देणारी बाब म्हणजे ॲंटी फंगल औषध दिल्यानंतर हे चारही रुग्ण आता बरे झाले आहेत. मात्र, डॉक्टरांनी सांगितले की, फुफ्फुसालाही पांढऱ्या बुरशीची लागण होते.