Mucormycosis: धक्कादायक! कोरोना संसर्गाच्या तुलनेत बुरशीजन्य आजारांनी अधिक मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 12:06 PM2021-05-29T12:06:28+5:302021-05-29T12:07:57+5:30
Mucormycosis: इंडियन क्लिनिकल मेडिकल रिसर्च संस्थेने (आयसीएमआर) केलेल्या संशोधन अहवालातून ही बाब समोर आली आहे.
मुंबई : कोरोनाच्या उपचारात अँटिबायोटिक्सचा अतिवापर आणि बुरशीजन्य आजार रुग्णांसाठी घातक ठरत असल्याचे दिसून आले आहे. नुकतेच इंडियन क्लिनिकल मेडिकल रिसर्च संस्थेने (आयसीएमआर) केलेल्या संशोधन अहवालातून ही बाब समोर आली आहे. या संशोधन अहवालात मुंबईतील सायन आणि हिंदुजा रुग्णालयांचा समावेश होता. अहवालानुसार, कोरोना संसर्गाच्या तुलनेत बुरशीजन्य आजारांमुळे अधिक मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे.
इंडियन क्लिनिकल मेडिकल रिसर्च संस्थेने देशभरातील १७,५३४ रुग्णांचा अभ्यास केला. त्यातील चार टक्के रुग्णांचा मृत्यू बुरशीजन्य आजारांनी झाल्याचे दिसून आले. बुरशीजन्य आजाराचे ६३१ रुग्ण आढळले, त्याचे प्रमाण ३.६ टक्के हाेते. या आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण ५६.७ टक्के आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे प्रमाण १०.६ टक्के आहे.
या संशोधन अहवालाविषयी आयसीएमआरच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले, अँटिबायोटिक्सचा वापर विनाकारण केल्यास शरीरावर विपरीत परिणाम होतो. परिणामी, गुंतागुंत निर्माण झाल्याने मृत्यू ओढावतो. यात १७ टक्के रुग्णांना बुरशीजन्य आजार असल्याचे दिसून आले, तर ७३ टक्के अँटिबायोटिक्सचा वापर करण्यात आला. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुण कोरोना रुग्णांनी घरी असतानाच अँटिबायोटिक्स घेण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले, त्यामुळे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांना अधिक क्षमतेच्या अँटिबायोटिक्सची गरज लागल्याचेही निदर्शनास आले.
गरज नसताना अँटिफंगल औषधांचा वापर धाेकादायक
संशोधन अहवालात १० टक्के रुग्णांनी गरज नसताना अँटिफंगल औषधांचा वापर केल्याचे दिसून आले. सध्या म्युकरमायकोसिसच्या धोक्यामुळेही अँटिफंगल औषधांचा गैरवापर होताना दिसत आहे. हे धाेकादायक आहे. त्यामुळे रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा किंवा बदल झाल्यानंतर त्वरित उपचारांची दिशा बदलून औषधांविषयी योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.
- डॉ. कैलास डिसुजा