प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुजरात पोलिसांनी रविवारी इस्लामिक धर्मोपदेशक मुफ्ती सलमान अझहरी यांना मुंबईतून अटक केली. अजहरींना घाटकोपर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. यावेळी मुफ्ती यांच्या हजारो समर्थकांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. त्यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी करण्यात येत होती.
समर्थक मोठ्या संख्येने जमा झाल्याने परिसरात वाहतूक कोंडी देखील झाली होती. काही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस कुमकही वाढविण्यात आली आहे.
अझहरी यांनी आपल्या समर्थकांना आंदोलन न करण्याची विनंती केली. तसेच मी गुन्हेगार नाही आणि मला येथे गुन्हा करण्यासाठी आणण्यात आलेले नाहीय. ते तपास करत आहेत आणि मी देखील त्यांना सहकार्य करत असल्याचे माईकवरून सांगितले. तसेच जर माझ्या नशीबात असेल तर मी तुरुंगात जायला तयार आहे, असेही ते म्हणाले.
दुसरीकडे मुफ्ती यांच्या वकिलांनी पोलिसांवर आरोप केले आहेत. वकील वाहिद शेख यांच्या दाव्यानुसार अजहरी यांच्या घरी साध्या वेशात आज सकाळीच 35-40 पोलीस आले होते. आम्ही त्यांना कारण विचारले असता त्यांनी काही माहिती दिली नाही. अजहरी यांच्यासोबत बोलल्यानंतर पोलिसांनी सांगितले की गुजरातमध्ये त्यांच्याविरोधात 153 बी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.