Join us

गावठाणात ठसन

By admin | Published: April 23, 2015 6:22 AM

शहरातील अनेक गावठाणांमध्ये बोगस मतदानाच्या संशयावरून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गोठीवली, कुकशेत परिसरामध्ये दोन गटांमध्ये

नवी मुंबई : शहरातील अनेक गावठाणांमध्ये बोगस मतदानाच्या संशयावरून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गोठीवली, कुकशेत परिसरामध्ये दोन गटांमध्ये राडा झाला. तुर्भे, दारावे, कोपरखैरणेसह अनेक ठिकाणी तणावामुळे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. नवी मुंबईमधील मूळ गावठाणांमधील सर्व प्रभागांमध्ये प्रतिष्ठेची लढाई सुरू आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. बोगस मतदानावरून अनेक गावांमध्ये दोन गटांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. गोठीवलीमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक बाळकृष्ण पाटील यांनी पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांच्याकडे बोगस मतदान होत असल्याची तक्रार केली. आयुक्तांनी याविषयी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यास सांगितले. परंतु पाटील यांनी हुज्जत घातल्यामुळे त्यांना ताब्यात घेतले होते. यानंतर प्रकल्प्रग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मनोहर पाटील यांनाही ताब्यात घेतले होते. दिवसभर या ठिकाणी बोगस मतदान होत असल्याचे कारण सांगून अनेकांना चोप देण्यात आला. या ठिकाणी अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले होते. विशेष म्हणजे मतदान केंद्राच्या बाहेरच राजकीय कार्यकर्ते मतदारांवर आक्षेप नोंदविताना व त्यांना धमकावत असल्याचे चित्र दिसत होते. कुकशेत गावामध्येही राष्ट्रवादी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला. या ठिकाणी दगडफेकही करण्यात आली. यामध्ये काही गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. कुकशेत व सारसोळे गावचा काही भाग मिळून एक प्रभाग झाल्यामुळे येथील तणाव वाढला होता. दारावेमध्येही बोगस मतदानावरून महिलेस मारहाण झाली. तुर्भे गावात राष्ट्रवादी काँगे्रस व भाजपामध्ये प्रतिष्ठेची लढाई आहे. प्रचारादरम्यानही दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले होते. मतदानादिवशीही दिवसभर गावात तणावाचे वातावरण होते. मतदान केंद्र परिसरात सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना थांबण्यास मनाई केली होती. कोपरी, सानपाडा, कोपरखैरणे, शिरवणे, बोनकोडे व इतर गावांमध्येही तणाव होता. सिडको विकसित नोडपेक्षा गावठाणांमध्ये प्रचंड तणाव असल्याचे चित्र दिसत होते. पोलिसांनाही तारेवरची कसरत करावी लागली. (प्रतिनिधी)