मेगाब्लॉकमुळे गोंधळ
By Admin | Published: December 14, 2015 02:18 AM2015-12-14T02:18:08+5:302015-12-14T02:18:08+5:30
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील कल्याण व ठाणे अप जलदसह हार्बरच्या पनवेल-नेरुळ मार्गावरील दोन्ही दिशांना रविवारी घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय झाली
डोंबिवली : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील कल्याण व ठाणे अप जलदसह हार्बरच्या पनवेल-नेरुळ मार्गावरील दोन्ही दिशांना रविवारी घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय झाली. परिणामी, जलद मार्गाच्या फलाटावर शुकशुकाट होता, तर धीम्यावर तुलनेने जास्त गर्दी होती.
ब्लॉकच्या कालावधीत कल्याण-ठाणे अप जलदच्या गाड्या अप धीम्या मार्गावर वळवल्याने त्या सर्व स्थानकांवर थांबल्या. विशेषत: डोंबिवली स्थानकाच्या फलाट क्र. ५ वर लोकल न धावल्याने, त्या फलाटावरून प्रवास करणारे प्रवासी फलाट क्रमांक तीनवर आले. त्यामुळे तेथे गर्दी झाली. हार्बरच्या पनवेल-नेरुळ स्थानकांदरम्यान ब्लॉक असल्याने, त्या स्थानकांदरम्यान अप/डाउन दिशांवर फेऱ्या झाल्या नाहीत. पनवेलला येणाऱ्या आणि पनवेलहून सीएसटीहून येणाऱ्या लोकल फेऱ्या ब्लॉकच्या कालावधीत रद्द करण्यात आल्या होत्या, त्यामुळे त्या मार्गावरील प्रवाशांची काहीशी गैरसोय झाली. त्या कालावधीत सीएसटी-नेरुळ-सीएसटी या मार्गावर वाहतूक मात्र सुरू होती, पण पुढे जाणाऱ्यांना त्रास झाला. ट्रान्स हार्बर मार्गावरही पनवेलसाठी अप/डाउनच्या लोकल नेरुळपर्यंतच धावल्या. त्याच कालावधीत पनवेल-अंधेरी लोकल फेऱ्या रद्द केल्या होत्या. त्यामुळे त्या मार्गावरील प्रवाशांचीही पंचाईत झाली, ज्यांना ब्लॉक संदर्भात माहिती नव्हती, त्यांना ऐनवेळी समजल्याने त्यांची धावपळ झाली. प्रवाशांच्या सोईसाठी सीएसटी-नेरुळ आणि ठाणे - नेरुळ मार्गावर विशेष लोकल सोडण्यात आल्या होत्या, पण ही सुविधा फारशी प्रभावी नव्हती. (प्रतिनिधी)