लखनऊ : मुघलांच्या आक्रमणाआधी भारताची जागतिक व्यापारातील भागीदारी एक तृतियांश म्हणजेच 36 टक्के होती. त्यानंतर इंग्रज भारतात आले तेव्हा ती 20 टक्क्यांवर आली. स्वातंत्र्याच्या वेळी काही अर्थशास्त्रज्ञांनी टिप्पणी करत वाढीच्या दराला हिंदू ग्रोथ रेट म्हटले. इंग्रजांनी भारताचा ग्रोथ रेड केवळ 4 टक्क्यांनी वाढविला, मात्र मोदी सरकार आल्यानंतर भारतात अनेक परिवर्तन करण्यात आल्याचा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.
मुंबईमध्ये झालेल्या वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या उद्घाटन सत्रामध्ये त्यांनी हे वक्तव्य केले. उत्तर प्रदेशमध्ये अगणित संधी आहेत. शेतीसह व्यवसाय आणि पर्यटनामध्ये उत्तर प्रदेश देशात महत्वाचा आहे. उत्तर प्रदेशमध्ये दोन लाख कोटींची गुंतवणूक प्रत्यक्षात आली आहे.
लोकसभा निवडणुकीत 1.63 लाख मतदान केंद्रे होती. कुठेही हिंसक घटना झाली नाही. आधी आव्हाने होती, दर दुसऱ्या दिवशी दंगे होत होते. अराजकता, गुंडगिरी सुरू होती. आज राज्याने शांतता मिळविली आहे. आम्ही आव्हानांनाच संधी बनविली. प्रयागराज कुंभ सर्वात मोठा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र राहिला आहे. कोणतेही असे अक्षर नाही जे मंत्र बनू शकणार नाही, असे योगी म्हणाले.योगी आदित्यनाथांनी राज्यपाल राम नाईकांचीही भेट घेतली. यावेळी त्यांनी 30 महिन्यांच्या सरकारच्या कामगिरीची पुस्तिका दिली.
योगींच्या वक्तव्याचा खासदार ओवेसी यांनी समाचार घेतला आहे. योगी यांनी या वक्तव्यावरून त्यांना काडीचेही ज्ञान नसल्याचे सिद्ध केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी जरा तज्ज्ञांना तरी विचारायला हवे होते, ते मुख्यमंत्री म्हणून भाग्यवान असल्याचा टोला लगावतानाच भाजपाने गेल्या ६ वर्षांत काय केले आणि बेरोजगारीचे काय असा प्रश्न उपस्थित केला आहे.