- जमीर काझी मुंबई : मुंबई पोलीस दलातील अंमलदाराच्या स्वमालकीच्या घरांची स्वप्नपूर्ती आता लवकरच होणार आहे. खालापूर (जि. रायगड) येथील मौजे वयाळ येथील प्रस्तावित बृहन्मुंबई पोलीस सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या गृहप्रकल्पाच्या बांधकामाला आता लवकरच सुरुवात होणार आहे. तब्बल १२० एकर भूखंडावरील १० हजार घरांच्या मेगा प्रोजक्ट टाउनशिपचे भूमिपूजन येत्या १० ते १५ दिवसांत केले जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थित फेबु्रवारीच्या मध्यावर हा कार्यक्रम होईल, अशी चर्चा आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांना अल्प किमतीत अद्ययावत सुविधांसह निवारा उपलब्ध करणाऱ्या या गृहप्रकल्पाचे काम गेल्या दहा वर्षांपासून भूखंड हस्तांतरण, प्राधिकरणाची मान्यता, निविदा प्रक्रिया आणि मंजुरीच्या तांत्रिक बाबीच्या पूर्ततेअभावी प्रलंबित राहिले होते. विशेष पोलीस महानिरीक्षक व गृहनिर्माण सोसायटीचे मुख्य प्रवर्तक प्रताप दिघावकर यांनी सातत्याने याबाबत पाठपुरावा केला. त्यानंतर, आता कॉन्स्टेबलचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले जाणार आहे.
बृहन्मुंबई पोलीस गृहनिर्माण सोसायटीसाठी मुंबईतील ७ हजारांहून अधिक पोलिसांनी नोंदणी केली असून, आणखी ३ हजारांहून अधिक जणांना लवकरच सभासदत्व दिले जाईल. २०१०च्या सुमारास तत्कालीन पोलीस आयुक्त अरूप पटनायक यांनी कर्मचाऱ्यांना हक्काचे घर मिळावे, यासाठी क्लस्टर पद्धतीने गृहप्रकल्प बांधण्याची योजना राबविली. त्यामध्ये सभासद होणाºया पोलिसांकडून सुमारे सव्वा लाख रुपये भरून घेण्यात आले. मात्र, प्रस्तावित जागा मूळ शेतकऱ्यांडून खरेदी करणे, त्याचे अकृषी क्षेत्रात हस्तांतरणाच्या प्रक्रियेला विलंब लागत असल्याने प्रकल्प रखडला.
आता सर्व मंजुरी व तांत्रिक बाबींची पूर्तता झाली आहे. जागतिक निविदा मागवून प्रकल्पाचे काम हैदराबादच्या क्यूब कन्सल्टंट इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीला देण्यात आले आहे, तसेच गरजू सभासदांना बॅँक आॅफ इंडियाने अल्प दरात कर्ज उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे.
भूखंडाचे चार प्राधिकरणांकडे हस्तांतरण
वयाळ (ता. खालापूर) येथील १२० एकर भूखंडावरील कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सोसायटीला चार वेगवेगळ्या सरकारी प्राधिकरणाशी सातत्याने पत्रव्यवहार करावा लागला. सुरुवातीला हा परिसर एमएमआरडीएच्या कार्यकक्षेत होता. त्यानंतर, त्याचे सिडकोमध्ये नंतर नैना आणि त्यानंतर राज्य रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग करण्यात आला. त्यामुळे तांत्रिक मंजुरीच्या कामाला विलंब लागल्याचे समोर आले आहे.
पोलीस गृहनिर्माण सोसायटीच्या कामासाठीच्या सर्व परवानगी मिळाल्या आहेत. सर्व तांत्रिक बाबींची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बॅँक आॅफ इंडिया सभासदांना ८ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे येत्या दहा-बारा दिवसांत भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल. त्यानंतर, ४२ महिन्यांच्या कालावधीत सर्व प्रकल्प पूर्ण करून पोलिसांना घराचा ताबा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.- प्रताप दिघावकर (विशेष महानिरीक्षक व मुख्य प्रवर्तक बृहन्मुंबई पोलीस सहकारी संस्था).
पंधरा लाखांत ९०० चौरस फुटांचे घर
मुंबईतील पोलीस अंमलदारांना प्रामुख्याने प्राधान्य दिल्या जाणाºया या गृहप्रकल्पासाठी साडेसतरा लाखांमध्ये तब्बल ९०० चौरस फुटांची सदनिका मिळेल. त्यामध्ये त्यांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत २ लाख ६७ हजार इतके अनुदान मिळेल. त्यामुळे प्रत्यक्षात १५ लाख रुपये मोजावे लागतील. या ठिकाणी इतक्या आकाराच्या खासगी फ्लॅटची किंमत सध्या ४० ते ४५ लाखांच्या घरात आहे.