लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई - रंगभूमीवरील दोन अद्वितीय तारे असलेले बालगंधर्व आणि केशवराव भोसले यांनी एकत्र येऊन केलेले 'संयुक्त मानापमान' हे नाटक पुन्हा एकदा मराठी नाट्य रसिकांसमोर सादर होणार आहे. ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनयसम्राट अशोक सराफ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून नव्या संचातील 'संयुक्त मानापमान' नाटकाचा मुहर्त करण्यात आला.
मराठी रंगभूमीला लाभलेला १८० वर्षांचा इतिहास हजारो-लाखो सुवर्ण क्षणांचा साक्षीदार आहे. या सुवर्ण क्षणांच्या भांडारात असंख्य मौल्यवान घटना, प्रसंग सामावलेले आहेत. 'संयुक्त मानापमान' हे नाटक त्यातीतलच एक आहे. या नाटकात तत्कालीन सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडीच नव्हे, तर कलाजीवनाचे आणि कलावंताच्या माणुसकीचे भव्य दर्शन घडते. अशा या महत्त्वपूर्ण नाटकाची निर्मिती करण्याचे शिवधनुष्य अथर्व थिएटर्सने उचलले आहे. या नाटकाचा मुहूर्त नुकताच विलेपार्ले येथील मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाच्या तालीम हॉलमध्ये करण्यात आला. यावेळी नाटकाचे निर्माते संतोष काणेकर, लेखक अभिराम भडकमकर, दिग्दर्शक हृषिकेश जोशी, नाटकातील कलाकार-तंत्रज्ञ उपस्थित होते.
रंगभूमीवरील अतिशय महत्वाच्या असलेल्या 'संयुक्त मानापमान' या नाटकाची निर्मिती करण्याबद्दल अशोक सराफ यांनी निर्मात्यांचे आभार मानले. अशा प्रकारची संगीत नाटके येणे ही काळाची गरज असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. नवीन कलाकारांची फौज घेऊन आपण हे नाटक रंगभूमीवर आणत असून, आजच्या पिढीला संगीत नाटकाच्या सुवर्णयुगातील संगीताचा साज समजावा यासाठी हे नाटक पुन्हा रंगभूमीवर घेऊन येत असल्याचे या नाटकाचे दिग्दर्शक हृषिकेश जोशी म्हणाले. संगीत नाटकाला प्रेक्षक येत नसल्याचा गैरसमज आहे, पण दर्जेदार रंगावृत्ती रंगभूमीवर आणल्यास दर्दी रसिक अशा नाटकांना नक्कीच गर्दीरूपी आशिर्वाद देतात असा विश्वास नाटकाचे निर्माते संतोष काणेकर यांनी व्यक्त केला.