प्रवाशांना आकर्षित करण्याचा ‘मुहूर्त’ हुकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 06:37 AM2018-03-17T06:37:56+5:302018-03-17T06:37:56+5:30
लगीनसराई, सहल ‘इनकॅश’ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अत्याधुनिक, वातानुकूलित शिवशाही नैमित्तिक कराराअंतर्गत ५४ रुपये प्रति किलोमीटर दराने उपलब्ध करून दिली.
- महेश चेमटे
मुंबई : लगीनसराई, सहल ‘इनकॅश’ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अत्याधुनिक, वातानुकूलित शिवशाही नैमित्तिक कराराअंतर्गत ५४ रुपये प्रति किलोमीटर दराने उपलब्ध करून दिली. मात्र तरीही हे दर परवडणारे नसल्याचे म्हणत प्रवाशांनी शिवशाहीकडे पाठ फिरवली. त्यामुळे शिवशाहीच्या नैमित्तिक करारातील उत्पन्नात २०१५-१६च्या तुलनेत २०१६-१७मध्ये सुमारे ६ कोटींची घट झाली आहे. दुसरीकडे लग्नाचे मुहूर्त नसल्याने उत्पन्नात घट झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या आदेशानुसार महामंडळाने दरवर्षीप्रमाणेच यंदाही ‘लग्नसराईसाठी शिवशाही सज्ज’ असे प्रसिद्धिपत्रक प्रसिद्ध केले. त्यानुसार लग्नासह साखरपुडा, सहल यासाठी ४५ आसनी शिवशाही ५४ रुपये प्रति किमी दराने प्रासंगिक करारावर देण्याचे ठरले.
दिवसाला किमान ३५० किमीचे भाडे भरून संबंधितांना प्रासंगिक करार पद्धतीनुसार शिवशाही उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, इतर वाहतुकीच्या साधनांच्या तुलनेत हे दर अधिक असल्याचे प्रवाशांचे म्हणणे होते.
महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०१७-१८ अहवालानुसार, २०१५-१६मध्ये महामंडळाला ६४ कोटी ६३ लाख ४९ हजार इतके उत्पन्न मिळाले होते. तर २०१६-१७मध्ये महामंडळाला ५८ कोटी ६० लाख २० हजार इतक्या उत्पन्नावर समाधान मानावे लागले.
>अशी आहे दरातील तफावत
लग्नासह साखरपुडा, सहल यासाठी ४५ आसनी शिवशाही ५४ रुपये प्रति किमी दराने प्रासंगिक करारावर देण्याचे ठरले. दिवसाला किमान ३५० किमीचे भाडे भरून संबंधितांना प्रासंगिक करार पद्धतीनुसार शिवशाही उपलब्ध करून देण्यात आली. मात्र याच क्षमतेची इतर वाहने (विनावातानुकूलित) ३० ते ३५ रुपये प्रति किमी दराने उपलब्ध होत असल्याने वातानुकूलित सेवा नकोच असे म्हणत प्रवाशांनी शिवशाहीकडे पाठ फिरवली.
>लग्नाचे मुहूर्त नसल्याने अल्प प्रतिसाद
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात लग्नाचे मुहूर्त नसल्यामुळे राज्यभरातून प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे गतवर्षी नैमित्तिक कराराचे एकूण उत्पन्न खालावले. मात्र या वर्षी लग्नाचे मुहूर्त जास्त असल्याने शिवशाहीला चांगला प्रतिसाद मिळेल.
- रणजीतसिंह देओल, एसटी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
>‘लाल’परी सुसाट
एसटी महामंडळाने २०१५-१६ प्रमाणेच २०१६-१७मध्येही वर्षभरातील विविध यात्रांसाठीदेखील पारंपरिक लाल रंगाची एसटी करारावर दिली होती. त्यानुसार २०१६-१७मध्ये महामंडळाला ६६ कोटी ४६ लाख ७ हजार इतके उत्पन्न मिळाले. २०१५-१६मध्ये ५९ कोटी २४ लाख ४५ हजार इतके उत्पन्न मिळाले होते.