समृद्धी महामार्गावरील विश्रांती थांब्यांची मुहूर्तमेढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:06 AM2020-12-06T04:06:33+5:302020-12-06T04:06:33+5:30
पहिल्या टप्प्यात १७ ठिकाणांची निवड लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गावरील नागपूर ते शिर्डी ...
पहिल्या टप्प्यात १७ ठिकाणांची निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गावरील नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा मे, २०२१ पासून सुरू करण्याची लगबग सुरू झाली असतानाच आता या मार्गावरील विश्रांती थांब्यांसाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने जागा निश्चिती सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात या महामार्गाच्या दोन्ही बाजूंच्या १७ ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. प्रवाशांसाठी आवश्यक सर्व सोईसुविधांनी सज्ज असलेले हे थांबे खासगी कंत्राटदारांच्या माध्यमातून विकसित केले जातील.
महामार्गावरील नागपूर ते शिर्डी या पट्ट्यातील नागपूरच्या दिशेने सात तर शिर्डीच्या दिशेने सहा ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. कमीतकमी ५.८५ ते जास्तीतजास्त ८.७० हेक्टर जागा दिली जाईल. आमने, मारळ, मांडवा, वरदारी, शिवनी, मनकापूर, मार्ले आणि आमने या गावांजवळ हे भूखंड आहेत. या भूखंडांवर कार, बस आणि ट्रकसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, वाहनांना इंधन भरण्यासाठी पंप, वाहनांच्या दुरुस्तीसाठी गॅरेज, स्वच्छतागृहे, फूड माॅल, प्राथमिक उपचार करणारी आरोग्य केंद्रे, २४ तास वीज आणि पाणीपुरवठा अशा सेवा या ठिकाणी उभाराव्या लागणार आहेत. या सुविधांचे आराखडे आणि त्या उभारण्याची जबाबदारी कंत्राटदारांची असेल. पुढील ६० वर्षांसाठी खासगी कंत्राटदारांना या जागा भाडे तत्त्वावर देण्यात आल्या आहेत.
* एमएसआरडीकडून निविदा प्रसिद्ध
भूखंडांचा हा विकास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) निविदा प्रसिद्ध केली आहे. महामार्गावरील वृक्ष लागवड प्रकल्पाच्या धर्तीवर या भूखंडांच्या विकासासाठी आधी निविदाकारांची पात्रता निश्चित केली जाईल. त्यानंतर पात्र निविदाकारांना भूखंड भाडे तत्त्वावर विकास करण्यासाठी बोली लावण्याची परवानगी दिली जाणार आहे.