मुलींच्या वसतिगृहाला मिळणार मुहूर्त; विद्यापीठात सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 01:08 AM2019-03-10T01:08:28+5:302019-03-10T01:08:40+5:30
३-४ दिवसांत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या वर्षभरापूर्वी उद्घाटन झालेल्या मादाम कामा मुलींच्या वसतिगृहासाठी प्रवेश अर्ज मागवण्याचा मुहूर्त अखेर मिळाला आहे. येत्या ३ ते ४ दिवसांत त्यासंदभार्तील सूचना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यामुळे मुंबई विद्यापीठात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींना मोठा दिलासा मिळाला आहे.
वर्षभरापूर्वी डिजिटल पद्धतीने उदघाटन केलेल्या या वसतिगृहाचे काम अनेक तांत्रिक अडचणींमुळे रखडले होते. त्यामुळे विद्यार्थिनींच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली नव्हती. आता ती लवकरच सुरु होणार असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे या महिला वसतिगृहासाठी स्थापन झालेल्या समितीकडून ६० हजार रुपये प्रतिवर्ष इतके शुल्क ठरविण्यात आले होते. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार राज्यभरातून येणाऱ्या विद्यार्थिनींचा विचार करता युवासेनेने हे शुल्क कमी करता यावे यासाठी पाठपुरावा केला असल्याची माहिती सिनेट सदस्य वैभव थोरात यांनी दिली. या पार्श्वभूमीवर व्यवस्थापन परिषद आणि सिनेट सदस्यांच्या मागणीनुसार या समितीकडून वार्षिक शुल्काची रक्कम ८८०० इतकी करण्यात आली आहे. यासंदभार्तील माहितीही विद्यापीठ लवकरच संकेतस्थळावर देण्यात येणार आहे. १ एप्रिपासून वसतिगृह सुरु होणार असून त्याची प्रवेशप्रक्रिया येत्या काळात सुरु होणार असली तरी अद्याप वसतिगृहाची सुरक्षितता वाºयावरच आहे. नव्याने तयार झालेल्या या वसतिगृहाच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले नाहीत. या सोबतच वसतिगृहातील खिडक्यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षितता नाही. त्यामुळे विद्यार्थिनींची प्राथमिक सुरक्षितता अद्याप वाºयावरच असल्याचे थोरात यांनी म्हटले आहे.