Join us

अँटिलियाजवळ कार सापडताच वाझेंनी काय केलं..? ATSच्या अहवालातून धक्कादायक माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2022 11:27 AM

अँटिलिया स्फोटक प्रकरणात एटीएसचा अहवाल; वाझेंबद्दल धक्कादायक माहिती

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानींच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ वर्षभरापूर्वी आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणाचा तपास करणाऱ्या एटीएसच्या अहवालातून महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे निलंबित पोलीस अधिकारी आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सचिन वाझेंचा पाय आणखी खोलात गेला आहे. स्फोटकांनी भरलेली कार अंबानींच्या निवासस्थानाबाहेर आढळून आल्याचं समजताच वाझेंनी काय केलं, याची माहिती अहवालात आहे. 

स्फोटकांनी भरलेली कार अँटिलियाबाहेर उभी असल्याचं समजताच बॉम्ब निकामी करणारं पथक घटनास्थळी पोहोचलं. पथकाकडून शोधकार्य सुरू असताना तत्कालीन पोलीस अधिकारी सचिन वाझे तिथे दाखल झाले. बराच वेळ ते स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारजवळ उभे होते. पथकाला कारची तपासणी करायची असल्यानं त्यांना लांब जाण्यास सांगण्यात आलं. मात्र तरीही वाझे वारंवार कारजवळ येत होते, अशी माहिती अहवालात आहे.

सचिन वाझेंनी बॉम्ब निकामी करण्यासाठी आलेल्या पथकाच्या कामात वारंवार हस्तक्षेप केला. स्फोटकं आढळून आल्यानंतर पथकातील अधिकाऱ्यांनी त्यांना दूर उभं राहण्यास सांगितलं. तो प्रोटोकॉलचा भाग होता. मात्र वाझे सातत्यानं कारजवळ येत होते. यामुळे तुमच्यासह इतरांच्याही जीवाला धोका असल्याचं वाझेंना अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र तरीही वाझेंनी अनेकदा प्रोटोकॉल मोडला, असं एटीएसनं अहवालात नमूद केलं आहे.

काय घडलं 'त्या' दिवशी?२५ फेब्रुवारी २०२१ रोजी अँटिलियापासून ४०० मीटर अंतरावर एक स्कॉर्पियो कार आढळून आली. या कारमध्ये स्फोटकं असल्याचं तपासातून पुढे आलं. त्यानंतर एकच खळबळ उडाली. याचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला. या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझेंचा हात असल्याचं तपासातून पुढे आलं. त्यानंतर वाझेंना अटक झाली. 

टॅग्स :सचिन वाझेएटीएसमुकेश अंबानी