मुंबई - देशातील प्रसिद्ध आणि गर्भश्रीमंत उद्योगपती म्हणून मुकेश अंबानींचा जगभरात उल्लेख केला जातो. त्यामुळेच, अंबांनीच्या नवीन खरेदीचीही तितक्याच उत्सुकतेने चर्चा होत असते. मग, अंबांनीचं लंडनमधील घर असो वा मुंबईतील अँटिलिया बंगला असो. अंबांनीच्या चहाच्या कपाची ते त्यांनी खरेदी केलेल्या कारच्या ताफ्यांचीही चर्चा होत असते. अंबानींच्या कार ताफ्यात आता आणखी एका लक्झरी कारची एंट्री झाली आहे. रोल्स रॉयस ही कार आता अबांनी कुटुंबीयांच्या सेवेत असणार आहे.
मुंकेश अंबानी यांनी 13.14 कोटी रुपयांची रोल्स रॉयस ही कार खरेदी केली आहे. ब्रिटीश लक्झरी कार निर्मात्या कंपनीची ही गाडी आहे. दक्षिण मुंबईतील तारदेव क्षेत्रीय परिवहन कार्यालय (आरटीओ) येथे कंपनीने नोंदणी केली आहे. देशात खरेदी करण्यात आलेल्या रोल्स रॉयस कंपनीच्या कलिनन मॉडेल्सची पेट्रोलवर धावणारी ही कार आजपर्यंतची भारतातील सर्वात महाग कार असल्याचं आरटीओ अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. स्वत: मुकेश अंबानी ही कार वापरणार आहेत.
मुकेश अंबानी यांनी या कारसाठी व्हीव्हीआयपी नंबरही खरेदी केला आहे. अधिकाऱ्यांच्या मतानुसार, हा नंबर 0001 असा आहे. व्हिआयपी नंबरसाठी लोकांना 4 लाख रुपये अधिक खर्च करावा लागतो. पण, अंबानींना हवा असलेला नंबर सध्याच्या सिरीजमध्ये उपलब्ध नसल्याने आरटीओ कार्यालयाकडून या नंबरसाठी नवीन सिरीज सुरू करण्यात आली हे विशेष.
रोल्स रॉयसने 2018 मध्ये या मॉडेलची कार मार्केटमध्ये लाँच केली होती. त्यावेळी, कारची किंमत 6.95 कोटी रुपये होती. मात्र, ग्राहकांच्या मागणीनुसार कारमध्ये लेटेस्ट बदल करण्यात आले. त्यामुळे, या कारची किंमती पुन्हा वाढली आहे. दरम्यान, अंबानींनी या कारसाठी 20 लाख रुपये कर भरला असून 2037 पर्यंत ही कार रस्त्यावर धावण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच, रस्ते सुरक्षा कर रुपानेही 40 हजार रुपये देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे अंबांनीच्या सुरक्षा यंत्रणेलाही त्यांनी बीएमडब्लू कार दिलेली आहे.