मुंबई-
राज्याच्या राजकारणात एका बाजूला दसरा मेळाव्यावरुन दोन गटांमध्ये चढाओढ पाहायला मिळत असताना दुसऱ्याबाजूला देशाचे बडे उद्योगपतीही शिंदे आणि ठाकरेंना भेटू लागले असल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. बुधवारी देशातील आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता शनिवारी रात्री जवळपास साडेबारा वाजताच्या सुमारास रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि त्यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 'वर्षा' बंगल्यावर भेट घेतली आहे. या भेटीमागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. पण या भेटीबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती.
माध्यमांमध्ये या भेटीची चर्चा होऊ नये यासाठी रात्री उशिरा भेटीची वेळ ठरविण्यात आली होती अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. शनिवारी साडेबारा वाजताच्या सुमारास मुकेश अंबानी यांचा ताफा 'वर्षा'वर दाखल झाला होता. मुख्यमंत्री शिंदे आणि अंबानी यांच्यात नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली याचं कारण गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरे आणि गौतम अदानी यांच्या भेटीला अवघे काही दिवस उलटले असताना शनिवारी शिंदे-अंबानी यांच्यात झालेली भेट ही नक्कीच भुवया उंचावणारी आहे. पडद्यामागे नेमक्या काय घडामोडी सुरू आहेत याची उत्सुकता आता निर्माण झाली आहे. वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. त्यामुळे राज्यातील लाखो तरुणांचा रोजगार हिरवला गेला असल्याची टीका केली जात आहे. यानंतर सुरु असलेल्या राजकीय घडामोडीत अनंत अंबानी आणि एकनाथ शिंदे भेट ही एक महत्त्वपूर्ण घडामोड मानली जात आहे.