Join us

नरेंद्र मोदींच्या सभेला मुकेश अंबानींचे चिरंजीव, राजकीय वर्तुळात चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 9:57 PM

गेल्या काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांनी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा जाहीर केला होता. मिलिंद देवरा हे काँग्रेसचे दक्षिण मुंबईचे उमेदवार आहेत.

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत हजेरी लावली. त्यामुळे मुकेश अंबानी यांचा काँग्रेसला पाठिंबा आहे, की भाजपा याबाबत आता संभ्रम निर्माण झाला आहे. कारण, गेल्या काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांनी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा जाहीर केला होता. मिलिंद देवरा हे काँग्रेसचे दक्षिण मुंबईचे उमेदवार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्पेक्समधील एमएमआरडीएच्या मैदानावर सभा झाली. या सभेत मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आपल्या मित्रांसोबत दिसून आला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून मुकेश अंबानी यांचा पाठिंबा नक्की काँग्रेसला आहे का? असा सवाल उपस्थित होत असून याबाबत तर्कवितर्क सुरु आहेत. 

गेल्या काही दिवसांपूर्वी मिलिंद देवरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यात मुकेश अंबानी त्यांचा प्रचार करताना दिसत आहेत. यामध्ये 'मिलिंद देवरा हेच दक्षिण मुंबईसाठी योग्य प्रतिनिधी आहेत. त्यांनी दक्षिण मुंबईचे 10 वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. मला विश्वास आहे की, मिलिंद देवरा यांना दक्षिण मुंबईची सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जाण आहे,' असे मुकेश अंबानी म्हणाले आहेत. 

दरम्यान, आज बांद्रा-कुर्ला कॉम्पेक्समधील एमएमआरडीएच्या मैदानावर झालेल्या महायुतीच्या सभेत उपस्थितांना संबोधित करताना मोदींनी आपल्या सरकारने केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडतानाच काँग्रेसची कार्यशैली आणि धोरणांवर टीका केली.  

टॅग्स :मुकेश अंबानीनरेंद्र मोदीभाजपाकाँग्रेसलोकसभा निवडणूकमुंबई