मुंबई : राज्य सरकारच्या विविध विभागांकडे असलेली जुन्या योजनांबाबतची लाभार्थी महिलांची माहितीच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीसाठी वापरण्यात येणार असल्याचे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.
ही योजना राबवण्यासंबंधी विविध सरकारी विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी झाली. तीत सरकारच्या विविध विभागांकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे योजना राबवण्यावर चर्चा झाल्याचे समजते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येणार आहेत.
महिलांची माहिती जमविण्यासाठी होणारे कष्ट कमी करण्यासाठी विविध सरकारी विभागांकडे असलेली माहितीच वापरण्याची कल्पना आहे, असे महिला आणि बालविकास विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. ग्रामीण विकास आणि नागरी पुरवठा यांसारख्या विभागांकडे जुन्या योजनांसाठी संकलित केलेली लाभार्थी महिलांची माहिती आहे. त्यामुळे ती माहिती महिला आणि बालविकास विभागाला द्यावी, असे ग्रामीण विकास आणि नागरी पुरवठा विभागांना सांगण्यात आले असल्याची माहितीही या अधिकाऱ्याने दिली. लाडकी बहीण योजना महिला आणि बालविकास विभागातर्फे राबवण्यात येणार आहे.
महिला आणि बालविकास विभाग विविध विभागांनी दिलेली माहिती, लाभार्थी महिलांची बँक खाती आणि अन्य तपशील संकलित करून तो माहिती तंत्रज्ञान विभागाला देईल.
नव्या माहितीचे संकलन आव्हानात्मक
विविध विभागांकडे असलेली लाभार्थी महिलांची माहिती मिळवणे आणि तिची खात्री करणे तुलनात्मकदृष्ट्या सोपे आहे. कारण ती अन्य योजनांचा निधी वितरित करण्यासाठी वेळोवेळी वापरलेली आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी दिलेली माहिती संकलित करणे आव्हानात्मक काम आहे, असे महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
अर्ज छाननीसाठी अपुरा वेळ
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज मोबाइल ॲपद्वारे तसेच प्रत्यक्ष भरला जाऊ शकतो. परंतु, या अर्जाद्वारे संकलित होणाऱ्या माहितीची छाननी आणि पडताळणी करणे आवश्यक आहे.
हे एक मोठे काम असून, त्यासाठी आमच्याकडे असलेला वेळ अपुरा आहे, असेही अधिकाऱ्याने सांगितले.