मुक्काम पोस्ट महामुंबई : मनातली खदखद तर निघाली... पुढे काय...?

By अतुल कुलकर्णी | Published: December 19, 2022 08:28 AM2022-12-19T08:28:13+5:302022-12-19T08:29:13+5:30

अशा इव्हेंटची फोटो संधी कशी साधायची, त्यातून वातावरण निर्मिती कशी करायची याचे धडे मविआने भाजपकडून घेण्याची गरज आहे...

Mukkam Post Mahamumbai spacial article on mahavikas aghadi morcha mumbaincp congress shiv sena against bjp | मुक्काम पोस्ट महामुंबई : मनातली खदखद तर निघाली... पुढे काय...?

मुक्काम पोस्ट महामुंबई : मनातली खदखद तर निघाली... पुढे काय...?

Next

अतुल कुलकर्णी, 
संपादक, मुंबई 

महाविकास आघाडी आणि अन्य विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन मुंबईत शनिवारी महामोर्चा काढला. मोर्चाने प्रत्येकाच्या मनातली खदखद निघून गेली. कोणाची किती ताकद होती, तेही या मोर्चाने दाखवून दिले. ‘छोट्या शिवसेनेचा, छोटा मोर्चा’ असे वर्णन जरी देवेंद्र फडणवीस यांनी केले असले, तरी मोर्चात खरी ताकद ही उद्धव ठाकरे शिवसेनेचीच दिसून आली. त्या खालोखाल राष्ट्रवादीने आपली ताकद दाखवून दिली. काँग्रेसला मात्र या संधीचे सोने करता आले नाही.

ठाकरे शिवसेनेने मोठ्या प्रमाणावर मुंबईतून लोक गोळा केले. स्वतः उद्धव ठाकरे, पत्नी शर्मिला ठाकरे, आदित्य आणि तेजस सोबत रस्त्यावर उतरले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार, सुनील तटकरे यांच्यासह अनेक प्रमुख नेते मोर्चात अग्रभागी दिसले. छगन भुजबळ यांनी नाशिकहून, जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातून, तर शशिकांत शिंदे यांनी नवी मुंबईतून बऱ्यापैकी माणसे आणण्याचे काम केले. भुजबळ यांनी मोठमोठ्या कटआउटसह मुंबई गाठले. काँग्रेसच्या नेत्यांनी ५० हजार लोकांना आणण्याची कमिटमेंट केली होती. मात्र ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण आणि नवी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कौशिक यांचीच माणसे मोर्चात जास्त दिसत होती.

एरव्ही प्रत्येक गोष्टीत काँग्रेसच्या अंतर्गत चुकांवर टीकाटिप्पणी करणारे संजय निरूपम, मिलिंद देवरा, प्रिया दत्त यांच्यासह पक्षाचे नेतेपद घेतलेले कुणाल पाटील, प्रणिती शिंदे, नितीन राऊत ही मंडळीही मोर्चात फिरकली नाहीत. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे ही मोर्चात नव्हते. त्या उलट छोटासा जीव असणाऱ्या शेकापचे शंभर झेंडे मोर्चात दिसत होते. काँग्रेसची ताकद मोर्चात दिसली नाही. स्टेजवरून काँग्रेसचेच एक नेते समोर असलेली अर्धी मंडळी आपण आणली आहेत, असे सांगत होते. तेव्हा न राहवून एका नेत्याने, काँग्रेसचे कार्यकर्ते कधीपासून भगवे झेंडे घेऊन फिरू लागले? असा बोचरा सवाल केल्याची चर्चा आहे.

खरे तर शिवसेना, भाजपनंतर टक्केवारीमध्ये सगळ्यांत जास्त मतदार काँग्रेसकडे आहेत. मोठे संघटन आहे. मात्र सगळ्यांना एकत्र आणणारा नेता काँग्रेसला सापडत नाही. तसा तो शोधण्याची काँग्रेसची इच्छाशक्ती नाही. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांना या मोर्चासाठी मुंबईच्या नेत्यांनी सहकार्य केले नाही. नसीम खान, जिशान सिद्दिकी, अमीन पटेल, वर्षा गायकवाड, असलम शेख या नेत्यांनी ठरवले असते तर मुंबईत वीस, पंचवीस हजार लोक गोळा करणे कठीण नव्हते. मात्र तसे झाले असते तर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून भाई जगताप यांची कॉलर टाइट झाली असती. तसे होऊ न देण्याची खबरदारी अन्य नेत्यांनी घेतल्याचे दिसते. आजघडीला मुंबई काँग्रेसमधील अनेक नेत्यांना भाई मुंबईच्या अध्यक्षपदी नको आहेत. भाईंनादेखील आमदारकी मिळाल्यानंतर कशाला हे अध्यक्षपद असे वाटत असावे.

राष्ट्रवादीची मुंबईत फारशी ताकद नसताना त्यांनी आजूबाजूच्या नेत्यांच्या सहकार्याने माहोल तयार केला. स्वतः शरद पवार मोर्चात उतरले. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला स्वतःची एकजूट दाखवण्याची ही नामी संधी होती. भव्य मोर्चा निघाला असता तर त्याची देशभर चर्चा झाली असती. देशभर विरोधकांना एकत्र येण्यासाठी हा मोर्चा बूस्टर डोस ठरला असता. शिवाय मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांनाही या मोर्चामुळे जोश आला असता. मात्र या मोर्चाने केवळ इलेक्ट्रॉल पावडरचे काम केले. त्यामुळे काही काळ तरतरी आली असेल; पण पेशंट स्वतःच्या पायावर उठून धावण्याच्या स्थितीत येण्याची शक्यता नाही. सकल मराठा समाजाच्या मुंबईत निघालेल्या मोर्चासारखा अतिभव्य मोर्चा काढण्याची भाषा केली गेली. मात्र ज्या प्रेरणेने, पोटतिडकीतून, अस्वस्थतेमुळे तो मोर्चा निघाला ती अस्वस्थता, पोटतिडीक कालच्या मोर्चात दहा वीस टक्केही दिसत नव्हती. 

तिन्ही प्रमुख पक्षांनी मोर्चात येणाऱ्यांना वेगवेगळ्या वेळा दिल्या. त्यामुळे सकाळी नऊपासून लोक येत राहिले. किती वाजता मोर्चा सुरू करायचा याविषयी निश्चित वेळ कोणाकडेही नव्हती. जसे लोक येत गेले, तसे त्यांनीच मोर्चा सुरू केला. मोर्चा जे जे उड्डाणपुलावरून न्यायचा की खालून याविषयी संभ्रम होता. अनेकजण पुलावरून गेले. अनेकजण खालून गेले. अशा इव्हेंटची फोटो अपॉर्च्युनिटी कशी साधायची, त्यातून वातावरण निर्मिती कशी करायची याचे धडे महाविकास आघाडीने भाजपकडून घेण्याची गरज आहे. त्यात त्यांचा अभ्यास कमी पडला, आणि फोटोच्या माध्यमातून जो परिणाम साधायला हवा होता, तोही साधता आला नाही..!

आधी लगीन कोंढाण्याचं की रायबाचं?
तानाजी मालुसरे शिवाजी महाराजांना मुलाच्या लग्नाचे निमंत्रण द्यायला गेले आणि महाराजांनी त्यांच्यावर कोंढाण्याची जबाबदारी सोपवली. ‘आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं’ असं म्हणून तानाजी मालुसरे यांनी ती जबाबदारी स्वीकारली, हा इतिहास आठवण्यास कारण ठरले अशोक चव्हाण. महाविकास आघाडीच्या मोर्चासाठी ते उपस्थित राहिले नाहीत, यावरून तर्कवितर्क लावू नका. माझ्या निकटवर्तीयांच्या घरी लग्न आहे असे ट्वीटही त्यांनी केले. ज्याच्याकडे लग्न होते त्यांनी अशोकरावांची तारीख घेऊनच लग्न ठरवले होते; त्यामुळे अशोकरावांनी त्या निकटवर्तीय व्यक्तीच्या लग्नाला प्राधान्य दिले. त्यामुळे आधी लगीन कोणाचे हा प्रश्न महामोर्चात आला नसेल तर नवल..!

Web Title: Mukkam Post Mahamumbai spacial article on mahavikas aghadi morcha mumbaincp congress shiv sena against bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.