मुक्काम पोस्ट महामुंबई - ठाकरे गटाने जागा लढण्यासाठी घेतल्या की हरण्यासाठी...?
By अतुल कुलकर्णी | Published: April 8, 2024 09:30 AM2024-04-08T09:30:43+5:302024-04-08T09:31:06+5:30
वैशाली दरेकर डमी उमेदवार असल्याची सगळ्यात मोठी चर्चा आहे. त्याला कारणही तसेच आहे.
अतुल कुलकर्णी
मुंबईच्या ६, ठाण्यातील ३, रायगड, पालघरमधील प्रत्येकी १ अशा ११ लोकसभा मतदारसंघासाठी प्रमुख पक्षांची काही नावे निश्चित झाली आहेत. लढाई थेट होणार असली, तरी काही जागा उद्धव ठाकरे गटाने लढण्यासाठी घेतल्या की हरण्यासाठी, हा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. याचे थेट उदाहरण म्हणजे कल्याण लोकसभा मतदारसंघ. प्रचार करताना मध्यंतरीच्या काळात आदित्य ठाकरे यांनी आपण ठाण्यातून उभे राहू... कल्याणमधून उभे राहू.., असे आव्हान दिले होते. प्रत्यक्षात ते उभे राहणार नसले तरी समोर विद्यमान व सत्ताधारी पक्षाचा खासदार उभा आहे हे लक्षात घेऊन तुल्यबळ उमेदवार द्यायचा की कमकुवत... हा निर्णय ठाकरे गटाला घ्यायचा होता. त्यांनी मनसेमधून आलेल्या वैशाली दरेकर यांची उमेदवारी जाहीर केली. मध्यंतरी झालेल्या पडझडीच्या काळात दरेकर उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिल्या. आपण पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्याचे सांगितले गेले. प्रत्यक्षात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघात काय चर्चा सुरू आहे? त्यांच्याच पक्षाचे लोक काय बोलतात? इतरांच्या काय प्रतिक्रिया आहेत? याचा अंदाज आतापर्यंत उद्धव ठाकरे यांना आला असेल.
वैशाली दरेकर डमी उमेदवार असल्याची सगळ्यात मोठी चर्चा आहे. त्याला कारणही तसेच आहे. याआधी विधानसभा निवडणुकीत सुभाष भोईर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. मात्र, एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांच्या स्थानिक राजकारणातून आयत्यावेळी एबी फॉर्म रमेश म्हात्रे यांना दिला गेला. तो इतिहास पाहता आता देखील ठाकरे यांच्याकडून ऐनवेळी दरेकर यांची उमेदवारी बदलली जाईल, अशी चर्चा आहे. या चर्चेला तातडीने उत्तर देणे महत्त्वाचे आहे. ही चर्चा अशीच चालू राहिली, तर स्वपक्षाचे कार्यकर्तेही वैशाली दरेकर यांचा प्रचार करणार नाहीत. आम्ही मतदारसंघात घाम गाळायचा आणि त्यांनी वरती सेटलमेंट करायची. त्यापेक्षा आम्ही घरी बसलेले बरे..., अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्ष कविता गावंड यांनी उघडपणे दिली आहे.
अनेकांनी यासाठी संजय राऊत यांच्याकडे अंगुलीनिर्देश केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून वरुण सरदेसाई कल्याणमध्ये फिरत आहेत. शिंदे गटाची उमेदवारी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. गुढीपाडव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोणती भूमिका घेतात? हे पाहून आयत्यावेळी कल्याणमधून ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून वरुण सरदेसाई किंवा केदार दिघे यांचे नाव पुढे येईल, ही चर्चा ठाकरे गटासाठी अडचणीची ठरू शकते. दरेकर यांना उमेदवारी देऊन पक्षाने ही जागा लढायचेच सोडून दिले, हा संदेश ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये गेला आहे. तो खोडून काढायचा असेल तर स्वतः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना कल्याणमध्ये जाऊन बसावे लागेल किंवा गुढीपाडव्यानंतर पक्षाचा उमेदवार तरी बदलावा लागेल, अशी भावना त्या भागात आहे. तुम लढो हम कपडे संभालते हैं, अशी श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे.
जी अवस्था कल्याणची तीच भिवंडीची. भिवंडीत भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्या विरोधात बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे यांना शरद पवार गटाने उमेदवारी दिली. त्यांच्या उमेदवारीसाठी पडद्याआडून जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांच्याकडे मोठी फिल्डिंग लावली. त्यामुळे १९६७ ते २०२४ या ५७ वर्षांच्या कालखंडात ८ वेळा लोकसभा जिंकणाऱ्या काँग्रेसला या मतदारसंघावर पाणी सोडावे लागले आहे. अशोक चव्हाण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना बाळ्या मामा काँग्रेस प्रवेशासाठी गांधी भवनमध्ये गेले होते. मात्र, त्या ठिकाणी त्यांना अज्ञात शक्तीचा फोन आला आणि ते पक्षप्रवेश सोडून परत फिरले. या पक्षातून त्या पक्षात उड्या मारण्याचा त्यांचा दांडगा अनुभव आहे. आयत्या वेळी निवडणुकीतून अंग काढून घेण्याचे कसबही त्यांच्याकडे आहे. पालघरमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या विरोधात हितेंद्र ठाकूर यांनी उमेदवार देण्याची भूमिका घेतली आहे. मुंबईमध्ये शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांच्या विरोधात ठाकरे गटाने अनिल देसाई यांची उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात धारावी आहे. तेथे वर्षा गायकवाड यांचे प्राबल्य आहे. तेवढे अनिल देसाई यांचे नाही. तरीही ठाकरे गटाने हा मतदारसंघ का घेतला माहिती नाही. मुंबईतील अजून दोन मतदारसंघात काँग्रेसला उमेदवार मिळत नाहीत, म्हणून जाहीर होत नाहीत. भाजप, शिंदे गटातला वाद मिटत नाही म्हणून तीन मतदारसंघात उमेदवारी जाहीर झालेली नाही.
भिवंडीत बाळ्या मामा यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसचे पदाधिकारी राजीनामा देतील, असे काँग्रेसचे महेंद्र घरत यांनी जाहीर केले आहे. काँग्रेसचेच दयानंद चोरघे यांनीही बंडाचे निशाण फडकवले आहे. भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत चोरघे यांचे मधुर संबंध आहेत. त्यामुळे त्यांची बंडखोरी नेमकी कोणासाठी हा प्रश्न आहेच. कल्याणमध्ये भाजपचे राकेश जैन यांनी बंडखोरीची भाषा केली आहे.
भाजपने बंडखोरी केली, तर आम्हाला आमचा विचार करावा लागेल, असे कल्याणचे शिंदे गटाचे प्रमुख गोपाळ लांडगे यांनी सांगितले आहे. आमदार गणपत पाटील यांचा विषय अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे भाजपमधूनही बंडखोरीची भाषा होत आहे. विजय शिवतारे यांनी अजित पवार यांना राक्षस तर शरद पवारांना महाराक्षस, अशी उपमा दिली होती. दोन- चार दिवसांतच त्यांनी यू टर्न घेत अजित पवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ स्वीकारला. फोटोमध्ये पुष्पगुच्छ दिसतो. मात्र, तो किती रुपयांना पडला याची किंमत कधीच दिसत नाही. बंडखोरीच्या भाषा केल्या की, पुष्पगुच्छ देऊन मनोमिलन केले जाते. मात्र, अशा मनोमिलनाची किंमत बुके विकत आणणाऱ्याला आणि विरोधी गटाला चुकवावी लागते, हे कटू वास्तव आहे.