समाजातील गरजू लोकांच्या मदतीसाठी अनेक जण नेहमीच मदतीचा हात देत असतात. विविध संस्था, विविध क्षेत्रातील मंडळी लोकांना मदत करत असतात. असाच कौतुकास्पद प्रयत्न "मुक्काम पोस्ट शाळा" या नाटकाने केला आहे. नाटकातून सामाजिक प्रबोधन करण्यासोबतच अनाथ आणि ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे.
"मुक्काम पोस्ट शाळा" या दोन अंकी नाटकाचा विशेष प्रयोग पंचक्रोशीतील गरजू आणि अनाथ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी आयोजित करण्यात आला आहे. सादरकर्ते कोंडवी वाडी उत्कर्ष मंडळ आणि गुहागर येथील उमराठ गावचे सुपुत्र मंगेश गावणंग यांनी हे नाटक लिहिलं आहे.
विनोदी तसेच समाज प्रबोधनपर असलेल्या मुक्काम पोस्ट शाळा या दोन अंकी नाटकामधून आपल्या मराठी शाळेतील आठवणी जाग्या तर होणारच शिवाय काही गमतीदार किस्से, सामाजिक संदेश तसेच काही मनाला चटका लावणारे प्रसंग पाहायला मिळणार आहेत. नाटकाच्या मुंबईमधील पहिल्या प्रयोगाला रसिकांचा आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मंडळींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.
नाट्य-प्रयोगातून मिळणारे उत्पन्न, अनाथ आणि ग्रामीण शाळा, हॉस्टेलमधील गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी करणार असल्याची माहिती आयोजक दिलीप डिंगणकर, कला संगमचे वैभव धनावडे, योगेश गावणंग, मनोज गावणंग यांनी दिली आहे. या नाटकाचा तिसरा प्रयोग रविवारी, १७ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ४ .०० वाजता, साहित्य संघ, गिरगांव, चर्नी रोड, मुंबई येथे सादर होणार आहे. हे नाटक नाट्य रसिकांनी पाहायला विसरू नका.
तिकीट संपर्क ९७६६४९२५५९८२०२५३५४९