सन २००१ साली माझा पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातील अभ्यासक्रम पूर्ण झाला आणि नेमके त्याचवेळी माझी तिथली सिनियर मधुगंधा कुलकर्णीचा निरोप मिळाला की, ती मुंबईत राहत असलेल्या हॉस्टेलमध्ये एक खोली रिकामी झाली आहे. मधुगंधामुळेच मला ती खोली मिळाली आणि माझा मुंबईत राहण्याचा प्रश्न मिटला. त्यावेळी बहुदा नशीब माझ्यावर खूश होते. मुंबईत येताच आठवडाभरात मला व्यावसायिक नाटकही मिळाले. ललित कला केंद्रात आम्हाला शिकवायला मंगेश कदम, जयंत पवार, राजीव नाईक, विजय केंकरे असे या क्षेत्रातले दिग्गज येत असत. त्यांना माझे काम आणि क्षमता माहीत होती. त्यामुळे मंगेश कदम दिग्दर्शन करत असलेले सुयोगचे 'आम्हाला वेगळं व्हायचंय' हे नाटक मला पटकन मिळाले.
माझ्या या क्षेत्रात ओळखी वाढू लागल्या. त्यासाठी मी मोकळ्या वेळात वेगवेगळ्या नाट्यगृहांत जात असे. पैसे फारसे जवळ नसायचे. त्यामुळे बऱ्याचदा विंगेतून नाटके बघायचे. बॅक स्टेजलाच जायचे असल्यामुळे मी बहुतेक सगळ्या नाट्यगृहांत मागच्या दारानेच प्रवेश करायचे. आताही मागच्या दारानेच ग्रीन रूमला जाते, फरक इतकाच की, आता त्या नाटकात काम करत असल्याने ताठ मानेने मी नाट्यगृहात शिरते. इथे आल्यावर मला सुप्रिया मतकरी, रसिका जोशीसारख्या मैत्रिणी आणि मुग्धा गोडबोले, अश्विनी एकबोटेसारख्या रूम पार्टनर्स मिळाल्या. मला माझ्या एका कामातून दुसरे काम मिळत गेले. 'देहभान'सारखे नाटक आणि 'चकवा' हा माझा पहिला चित्रपट मिळाला.
या शहराच्या वेगाशी जुळवून घ्यायला मला थोडा वेळ लागला. पैसे वाचविण्यासाठी मी मुंबईत दोन-दोन तास रस्त्याने चालायचे. पण या शहराचा अंदाज यायला मला त्याची मदत झाली. ट्रेनचा प्रवास मला कायमच टेन्शन द्यायचा. कुठली स्टेशन्स कुठल्या बाजूला येतील, त्यांचे गणित काही केल्या जुळेना. त्यात परत पूर्व कुठली आणि पश्चिम कुठली, हा गोंधळ असायचाच. इतके सगळे असूनही मला मुंबईबद्दल प्रचंड आपुलकी वाटते. हे शहर आमच्यासारख्या एकट्या किंवा मुली-मुली मिळून राहणाऱ्यांसाठीही सुरक्षित आहे. इथे कोणीही तुम्हाला उगाचच त्रास देत नाही. कारण तेवढा वेळच नाहीये कोणाला. मला तर माझ्या उमेदीच्या काळात मदत करणारी चांगली माणसेच जास्त भेटली. मुंबईत आर्थिक, सामाजिक स्तर भलेही खूप असतील, तरी सायकल चालविणारा आणि बीएमडब्ल्यू चालविणारा एकाच रस्त्यावर, एकाच गाडीवर वडा-पाव खाताना दिसेल. मुंबई शहर हे इथल्या अथांग समुद्रासारखेच सर्वांना आपल्या आत सामावून घेते.