Join us

Mukta Tilak: 'लोकमान्य टिळकांचा वारसा असला तरी...'; मुक्ता टिळकांना एकनाथ शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 10:09 PM

Mukta Tilak: भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं आज निधन झालं. त्यांच्या निधानानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

Mukta Tilak passed away: भाजपाच्या आमदार व माजी महापौर मुक्ता शैलेश टिळक यांचे आज (गुरूवारी) दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 57 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे पती शैलेश टिळक, मुलगा कुणाल टिळक, मुलगी चैत्रीली टिळक, सून, जावाई असा परिवार आहे. मागील काही महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंजत होत्या. उपचारादरम्यान आज दुपारी त्यांची खासगी रूग्णालयात प्राणज्योत मालवली. उद्या(शुक्रवारी) सकाळी 9 ते 10 या वेळेत नारायण पेठेतील त्यांच्या निवास स्थानी त्यांचे पार्थिक अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर 11 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

मुक्ता टिळकांच्या निधानानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. लोकमान्य टिळकांचा वारसा लाभलेलं एक लढवय्ये नेतृत्व आपण आज गमावलं, असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितले. लोकमान्य टिळकांचा वारसा असला तरी आपल्या कामातून त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यामुळेच पुणे महापालिकेत सलग चार वेळा नगरसेविका नंतर पुण्याच्या महापौर आणि आमदार हा प्रवास त्या करू शकल्या, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

मुक्ताताईंची कर्तव्यनिष्ठा अन् कमिटमेंट; 'व्हील चेअर'वर येऊन केलं होतं मतदान, सगळ्यांनीच केला होता सलाम!

कर्करोगाशी झुंज देत असतांनाही राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून आपल्या कर्तव्य भावनेचा परिचय त्यांनी दिला. कर्तव्यनिष्ठ, लढवय्ये नेतृत्व आपण गमावले आहे, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

मुक्ता टिळक या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या आमदार होत्या. मुक्ता टिळक यांनी 2017 ते 2019 या काळात पुण्याचे महापौरपद भूषवले. त्या भाजपच्या पहिल्या महापौर ठरल्या. मुक्ता टिळक या बाळ गंगाधर टिळक यांचे नातू श्रीकांत टिळक यांच्या सूनबाई आहेत. बाळ गंगाधर टिळकांच्या त्या पणतसून आहेत. टिळकांचे पणतू शैलेश टिळक यांच्या त्या पत्नी होत. पुण्यातील भावे स्कूलमधून शालेय शिक्षण घेतलेल्या मुक्ता टिळकांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून पुढील शिक्षण घेतले. पुणे विद्यापीठातून त्यांनी जर्मन भाषाही शिकली. मार्केटिंग विषयात त्यांनी एमबीएची पदवी मिळवली. मुक्ता टिळकांनी पत्रकारितेचे शिक्षणही घेतले आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी हिंदुस्थान पेट्रोलियम, आरबीआय, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स, थरमॅक्स, प्रवीण मसाले आदी कंपन्यांमध्ये काम केले आहे.

आमदार होण्यापूर्वी त्या पुणे महापालिकेत नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. सदाशिव-नारायण पेठेतील प्रभाग क्रमांक 15 च्या त्या नगरसेविका म्हणून नेतृत्त्व करत होत्या. त्या सलग चारवेळा नगरसेविका म्हणून विजयी झाल्या होत्या. पुणे भाजपच्या महापालिकेतल्या गटनेत्या, स्थायी समितीच्या सदस्या अशा जबाबदार्‍या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर 2017 मध्ये त्या महापौरपदी विराजमान झाल्या होत्या. त्या महापौर असतानाच 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि कसबा विधानसभा मतदारसंघातून त्या भाजपच्या आमदार म्हणून विधानसभेत दाखल झाल्या होत्या. मुक्ता टिळक यांचे पतीही भाजपमध्ये सक्रिय आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"   

टॅग्स :मुक्ता टिळकएकनाथ शिंदेभाजपापुणे