ड्रग्ज तस्करीतून उभे केले कोट्यवधींचे साम्राज्य; ३ कोटींची मालमत्ता गोठवली
By मनीषा म्हात्रे | Published: November 30, 2023 08:42 PM2023-11-30T20:42:14+5:302023-11-30T20:42:21+5:30
ड्रग्ज विक्री करून तस्करांनी कोट्यवधींचे साम्राज्य उभे केल्याचे गुन्हे शाखेच्या कारवाईतून समोर आले.
मुंबई : ड्रग्ज विक्री करून तस्करांनी कोट्यवधींचे साम्राज्य उभे केल्याचे गुन्हे शाखेच्या कारवाईतून समोर आले. गुन्हे शाखेने त्यांची ३ कोटींची मालमत्ता गोठवली आहे. चार तस्करांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह नाशिक येथील मालमत्तांचा यामध्ये समावेश आहे.
गुन्हे शाखेच्या कक्ष ६ ने १६ ऑगस्ट रोजी अंमलीपदार्थ विक्री करणाऱ्या टोळीविरूध्द कायदेशीर कारवाई करत एमडी आणि चरसचा साठा जप्त केला. या गुन्हयात अदयापपर्यत एकुण १२ आरोपीना अटक करण्यात आली आहे. साहिल रमजान अली खान उर्फ मस्सा (२७), मोहमद अजमल कासम शेख (४५), शमसुद्दीन नियाजउद्दीन शहा (२२), इमरान अस्लम पठाण (३७), मोहमद तौसिफ शौकत अली मन्सुरी (२७), मोहमद इस्माईल सलिम सिध्दीकी (२४), सर्फराज शाबीरअली खान उर्फ गोल्डन भूरा (३६), रईस अमीन कुरेशी (३८), प्रियंका अशोक कारकौर (२४), काएनात साहिल खान (२८), सईद सज्जद शेख (३०) आणि अली जवाद जाफर मिर्झा (३१) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
यापैकी चार जणांचे ड्रग्ज विक्रीतून खरेदी केलेल्या मालमत्तावर टाच आणली. यामध्ये मस्सा याचे मालेगाव, नाशिक येथील १ फार्म हाऊस, शिळफाटा येथील फ्लॅट,घनसोली नवी मुंबई येथील रो हाऊससह ५१ ग्रॅम सोन्यासह ३५ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. काएनातच्या घणसोलीतील रो हाऊस, शिळफाटा येथील घर तसेच सर्फराजचे कार आणि मुंब्रा येथील फ्लॅटसहीत प्रियंकाच्या घरातून मिळालेलया १७ लाखांच्या रक्कमेचा यामध्ये समावेश आहे.
ड्रग्ज तस्करीवर आळा घालन्यासाठी गुन्हे शाखेने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे, तपास अधिकारी हणमंत ननावरे आणि अंमलदार यांनी ही कारवाई केली आहे.