पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयात बहुमजली वसतिगृह, २७० कोटी रुपयाच्या खर्चास मंजुरी
By संतोष आंधळे | Published: March 18, 2024 10:50 PM2024-03-18T22:50:15+5:302024-03-18T22:50:35+5:30
Mumbai News: वैद्यकीय शिक्षण विभागाने वरळी येथील रा. आ. पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयात बहुमजली वसतिगृह बांधण्यासाठी २७० कोटी रुपयाच्या खर्चास मंजुरी दिली आहे.
- संतोष आंधळे
मुंबई - राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वसतीगृहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. अनेकवेळा विध्यार्थ्यानी वसतिगृहाची संख्या वाढवावी यासाठी अनेकवेळा निवासी डॉक्टरांनी अनेकवेळा आंदोलने केली आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाने वरळी येथील रा. आ. पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयात बहुमजली वसतिगृह बांधण्यासाठी २७० कोटी रुपयाच्या खर्चास मंजुरी दिली आहे.
शासनाच्या अखत्यारीतील पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालय ८० वर्षापेक्षा अधिक जुने महाविद्यालय आहे. या ठिकाणी आयुर्वेदिक विषयातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी संपूर्ण राज्यातून विद्यार्थी प्रवेश घेत असतात. या ठिकाणी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे मिळून असे एकूण ७५० ते ८०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थी संख्या वाढली मात्र त्या प्रमाणे या ठिकाणच्या वसतिगृहाच्या संख्येत मात्र फारसा बदल झालेला नाही. त्यामुळे वसतिगृहाच्या एकाच खोलीत अनेक विद्यार्थी दाटीवाटीने राहत असतात. गेली अनेक वर्ष नव्याने वसतिगृह बांधले जावे अशी विद्यार्थां वर्गातून मागणी होत होती.
वैद्यकीय शिक्षण विभागाने नवीन बहुमजली वसतिगृह बांधण्यासाठी निधी मंजूर केल्याने या परिसरात येत्या वर्षात नवीन वसतिगृह उभारण्यात येणार आहे. त्याकरिता जुने वसतिगृह पाडून नवीन वसतिगृह उभारण्यात येईल. यामुळे विद्यार्थ्यांचा वसतिगृहाचा प्रश्न कायमचा निकालात निघणार आहे.
आयुर्वेदिक उपचारासाठी राज्यातून रुग्ण
आयुर्वेद अभ्यासक्रमामध्ये औषधि वनस्पतींना विशेष महत्व आहे. या महाविद्यलयाच्या परिसरात सुमारे दीड एकर क्षेत्रात विविध प्रजातींच्या लहान मोठ्या औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. आयुर्वेदात अशा काही खास वनस्पती सांगितल्या आहेत ज्यांचा उपयोग वेगवेगळ्या कारणासाठी केला जातो. या महाविद्यालयाशी संलग्न रुग्णलयात आयुर्वेदिक उपचारांसाठी राज्यातून रुग्ण येत असतात.