मुंबई : मुंबईकरांच्या सेवेसाठी एमएमआरडीएमेट्रोचे जाळे शहर उपनगरात विणत आहे. त्यापैकी एक स्वामी समर्थ नगर (जोगेश्वरी) ते विक्रोळी महामार्ग या मेट्रो ६ मार्गिकेचे काम युद्धपातळीवर सुरू असून प्रवाशांना स्थानकात पोहोचणे अधिक सुलभ व्हावे, यात गतिशीलता यावी, तसेच प्रवाशांना गंतव्य अंतिम स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी एमएमआरडीए प्रयत्न करत आहे.
बहुवाहतूक परिवहन एकत्रीकरण या नियोजनाअंतर्गत प्रवाशांना ऑटो रिक्षा, विद्युत वाहने, स्थानकांपर्यंत व स्थानकांपासून ये- जा करणारी वाहने, बेस्ट बससेवा, सायकल सेवा आदी उपलब्ध करून देण्यासाठी व त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडून कंत्राटदार नेमण्यात येणार आहे.
१३ स्थानकांमध्ये बहुवाहतूक प्रकल्प :
मेट्रो ६ मार्गिकेवरील १३ स्थानकांमध्ये एमएमआरडीए बहुवाहतूक परिवहन एकत्रीकरण प्रकल्प राबवणार आहे.
या प्रकल्पाअंतर्गत प्रवाशांना ऑटो रिक्षा, विद्युत वाहने, स्थानकांपर्यंत व स्थानकांपासून ये- जा करणारी वाहने, बेस्ट बससेवा, सायकल सेवा आदी उपलब्ध करून देण्यासाठी एमएमआरडीए प्रयत्न करत आहे.
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरिता एमएमआरडीए स्वामी समर्थ नगर ते जेव्हीएलआर टप्पा एक, शामनगर ते राम बाग टप्पा दोन आणि पवई लेक ते विक्रोळी अशा तीन टप्प्यांत कंत्राटदाराची नियुक्ती करणार असून त्यासाठी निविदा काढण्यात आली आहे.
६,७१६ कोटींचा खर्च:
भविष्यात स्वामी समर्थ नगर ते विक्रोळीदरम्यान धावणाऱ्या मेट्रो ६ प्रकल्पाचे काम जोरदार सुरू आहे. १५.३१ किमी लांबीच्या या मार्गात १३ स्थानके असून कांजूरमार्ग येथे कारशेड डेपो उभारण्याचे कामदेखील सुरू आहे. हे कारशेड १५.०२ हेक्टर परिसरात वसले आहे. या प्रकल्पासाठी ६,७१६ कोटी एमएमआरडीए खर्च करणार आहे.
चार टप्प्यांत कंत्राटदारांची नियुक्ती :
१२ महिने बांधकामाचा कालावधी व दोन वर्षे दोषदायित्व कालावधीकरिता चार टप्प्यांत कंत्राटदारांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी सुमारे १३१.३२ कोटी खर्च केले जाणार आहेत. २ फेब्रुवारी २०२४ पर्यंत इच्छुक कंपन्यांना निविदा भरता येणार आहेत.