बहुबांधकामधारकांना मिळणार एकाच जागेचा मोबदला
By admin | Published: April 12, 2017 02:00 AM2017-04-12T02:00:36+5:302017-04-12T02:00:36+5:30
ठाण्याच्या विविध भागात रस्ता रुंदीकरणाची मोहीम जोरात सुरू आहे. यात बाधित होणाऱ्यांमध्ये एकच व्यक्ती आहे. मात्र, तिने तीन ते चार ठिकाणी बाधित झाल्याचे पुरावे
ठाणे : ठाण्याच्या विविध भागात रस्ता रुंदीकरणाची मोहीम जोरात सुरू आहे. यात बाधित होणाऱ्यांमध्ये एकच व्यक्ती आहे. मात्र, तिने तीन ते चार ठिकाणी बाधित झाल्याचे पुरावे सादर करून, पुनर्वसनचा मोबदला मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, परंतु तीन ते चार ठिकाणी जरी त्यांची मालमत्ता यापूर्वी असली, तरी ती बेकायदा असल्याचे सांगून पालिकेने त्या व्यक्तीचे एकाच जागेसाठीचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुनर्वसनाच्या नावाखाली तीन ते चार गाळे अथवा खोल्या बळकाण्याचा प्रयत्न करणाऱ्या भूमाफियांचे धाबे निर्णयामुळे चांगलेच दणाणले आहेत. शहरात बेकायदा बांधकामे करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळू नये, म्हणून प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
या पुनर्वसन प्रक्रियेदरम्यान बांधकामधारकांची कागदपत्रे तपासण्यात येत असून, त्या आधारेच संबंधितांचे पुनर्वसन केले जात आहे. मात्र, शहरातील अनेक भागांत एकाच व्यक्तीची तीन ते चार बेकायदा बांधकामे बाधित झाली असून, त्या बदल्यात संबंधित व्यक्ती महापालिकेकडे मोबदला देण्याची मागणी करत आहेत. ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली असून, त्यांनी आता अशा बांधकामधारकांना केवळ एकाच जागेचा मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, शहरातील अनेक भागांत काही व्यक्तींनी दोनपेक्षा जास्त बेकायदा बांधकामे केली आहेत.
अशा व्यक्तींना सर्वच जागांचा मोबदला देऊ केला, तर बेकायदा बांधकामे करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे शहरात पुन्हा बेकायदा बांधकामे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच अशांना प्रोत्साहन मिळू नये, म्हणूनच अशा व्यक्तींना एकाच जागेचा मोबदला देण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भातील कार्यादेश लवकरच काढण्यात येणार आहे.
एकूणच मागील कित्येक वर्षे कोणाचा धाक नसल्याने, शहराच्या विविध भागांत छोटी-मोठी बेकायदा बांधकामे करून, जमिनी बळकाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनादेखील हा मोठा धक्का मानला जात आहे. (प्रतिनिधी)
महापालिकेकडून पुनर्वसन करण्यात येणार
शहरातील घोडबंदर, पोखरण, कापूरबावडी, वर्तकनगर, स्टेशन परिसर, समतानगर, मुंब्रा आदींसह इतर भागांत मागील काही महिन्यांपासून रस्ता रुंदीकरणाची कारवाई सुरू झाली आहे. या मोहिमेत बाधित होणाऱ्या बेकायदा बांधकामधारकांचे महापालिकेकडून बीएसयूपी आणि भाडे तत्त्वावरील घरांमध्ये पुनर्वसन करण्यात येत आहे.