लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई - राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने लवकरच मॉरिशस येथे बहुउद्देशीय संकुल उभारण्यात येणार आहे, त्यासाठी तब्बल आठ कोटी रुपयांची तरतूद शासनाने केली आहे.
नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह चार सदस्यीय शिष्टमंडळाने मॉरिशसला भेट दिली होती. या भेटीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे. मॉरिशसच्या या नव्या बहुउद्देशीय संकुलात पर्यटन माहिती केंद्र, बैठक हॉल, कॉन्फरन्स हॉल इ. असणार आहे. मॉरीशस येथून भारतास भेट देणाऱ्या पर्यटकांना राज्यातील पर्यटन स्थळांची प्रसिध्दी मिळावी. तसेच, राज्यातील पर्यटन स्थळी उपलब्ध असणाऱ्या आर्थिक गुंतवणूकीच्या संधीची गुंतवणूकदारांना माहिती व्हावी हा उद्देश आहे.
या बहुउद्देशिय संकुल उभारण्यासाठी एक विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी व संनियंत्रणासाठी पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.