मुंबई - काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या विधानानंतर, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भूमिका स्पष्ट केली. आमचा सिनेमा चालला तर चालतो किंवा पडला तर पडतो सांगता येत नाही. सुदैवाने आमचा सिनेमा बरा चालला आहे, असे चव्हाण यांनी म्हटले होते. चव्हाणांच्या या वक्तव्यानंतर, आमचा सिनेमा हा मल्टिस्टारर सिनेमा असून तो यशस्वी होणार, असे थोरात यांनी म्हटलंय. तसेच, आम्ही पाच वर्षे आनंदाने काम करू, असेही ते म्हणाले.
महाविकास आघाडी स्थापनेपूर्वी, संविधानाच्या चौकटीत राहून हे सरकार चाललं पाहिजे, असं न झाल्यास सरकारमधून बाहेर पडायचं अशी कडक सूचना सोनिया गांधी यांनी दिली. याची संपूर्ण माहिती आम्ही उद्धव ठाकरे यांना दिली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या बाहेर जाणार नाहीत. घटना हीच शिरोधार्य मानून घटनेच्या चौकटीत सरकार चालणार, अशी भूमिका घेतली. त्यामुळे हे सरकार स्थापन झालं असं अशोक चव्हाणांनी नांदेड येथील कार्यक्रमात सांगितलं.
आमचं क्षेत्र असो वा सिनेमा, नाट्य क्षेत्र सारखचं असतं. आमचा सिनेमा चालला तर चालतो किंवा पडला तर पडतो सांगता येत नाही. सुदैवाने आमचा सिनेमा बरा चालला आहे. आम्ही तीन पक्ष एकत्र येऊ असं वाटत नव्हतं. पण आम्ही एकत्र आलो, हल्ली मल्टिस्टारचा जमाना आहे, तीन हिरो पाहिजे. त्यामुळे आमचं सरकार आलं असं विधान काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे. नांदेडमध्ये एका प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावर बोलताना, चव्हाण काय म्हणले हे मला माहित नाही, पण सरकार 5 वर्षे चालेल, असे थोरात यांनी स्पष्ट केलं.
संविधानाच्या चौकटीतच सरकार चालते, ते सगळ्यांना बंधनकारक आहे. कॉमन मिनिमम प्रोग्रॅम आणि संविधानांची बांधिलकी आहे, तसंच काम आम्ही करु. देशात संविधानाला धक्का लावण्याचं काम सुरू असल्याचंही थोरात यांनी म्हटलं. तसेच, अशोक चव्हाण यांनी नेमके काय विधान केले माहीत नाही. पण, आम्ही पाच वर्षे आनंदाने एकत्रित काम करणार, हा मल्टिस्टारर सिनेमा यशस्वी होणार, असेही थोरात यांनी स्पष्ट केले.