'मुळू मुळू रडणारा वाघ नसतो'; सुषमा अंधारेंचा रामदास कदमांवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 02:41 PM2023-03-20T14:41:50+5:302023-03-20T14:42:51+5:30
उद्धव ठाकरेंवरही त्यांनी जोरदार प्रहार केला होता. आता, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रामदास कदमांवर पलटवार केलाय.
मुंबई - शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेला उत्तर देण्यासाठी खेडमधील त्याच मैदानावर आणि त्याच वेळत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली. शिवसेना नेते रामदास कदम यांचा गड असलेल्या खेडमध्ये शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तर, रामदास कदमांनीही शिवसेनेतील घडामोडी सांगत, आम्हाला राजकारणातून संपवण्याचा कट रचल्याचं म्हटलं. उद्धव ठाकरेंवरही त्यांनी जोरदार प्रहार केला होता. आता, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रामदास कदमांवर पलटवार केलाय.
'योगेश कदम याला कसं संपवायचं? यासाठी ठाकरे गटाकडून षडयंत्र रचलं जात होतं. उदय सामंतही तेव्हा त्या गटात होते. कटात नव्हते. तो बदमाश सुभाष देसाई सगळ्यात पुढं होता. उद्धवजी, बाळासाहेब ठाकरे रामदास कदमसारख्या वाघाला सांभाळायचे, तुम्ही सुभाष देसाईसारख्या शेळ्या-मेंढ्यांना सांभाळता हा तुमच्यातला फरक आहे, अशी खरमरीत टीका रामदास कदम यांनी खेडमधील सभेतून केली होती. आता, त्यावरुन शिवसेना ठाकरे गटाकडून पलटवार करण्यात येत आहे.
सुषमा अंधारे यांनी रामदास कदमांना प्रत्युत्तर देताना, वाघ रडका नसतो असे म्हटले. रामदास कदमांना स्क्रीप्ट लिहून देणाऱ्यांनी कशी दिली, की यांनी नीट वाचली नाही. कारण, वाघ पाळत नसतात, वाघ स्वतंत्र असतो. कुत्री, मांजरी पाळली जातात, असे म्हणत अंधारे यांनी रामदास कदम यांच्यावर घणाघाती पलटवार केलाय. तसेच, वाघ मुळूमुळू रडत नसतो, असे म्हणत रामदास कदम हे काही दिवसांपूर्वी वृत्तवाहिन्यांवर पडले होते, त्यावरुन खोचक टोमणाही लगावला.
दरम्यान, शिवसेनेतील बंडाळीनंतर आता हा वाद दैनिक झाला असून दररोज शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट यांच्यात शाब्दीत संघर्ष होताना दिसून येतंय. कधी-कधी हा संघर्ष हिंसाचारातही परिवर्तीत होत असल्याने ही गंभीर बाब बनलीय.