महावितरणच्या मुलुंड विभागाने अलगीकरण कक्षासाठी एका दिवसात लावले १६७ वीज मीटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 01:34 PM2020-03-30T13:34:06+5:302020-03-30T13:36:42+5:30
महावितरणच्या भांडूप परिमंडलातील मुलुंड विभागाने आवश्यक असलेल्या अलगीकरण कक्षासाठी एका दिवसात १६७ वीज मीटर लावले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लॉकडाऊनच्या कालावधीत महावितरणमधील अधिकारी व कर्मचारी हे वीजपुरवठा सुरळीत व अखंडितपणे सुरु ठेवण्यासाठी परिश्रम करीत असून महावितरणच्या भांडूप परिमंडलातील मुलुंड विभागाने आवश्यक असलेल्या अलगीकरण कक्षासाठी एका दिवसात १६७ वीज मीटर लावले आहेत.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभर पसरला आहे. त्याचबरोबर तो भारतातही वेगाने वाढत आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोना निर्मूलनाच्या अनुषंगाने अलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात येत आहे. अलगीकरण कक्षाची सुविधा देण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत काही गृहप्रकल्पांची निवड करण्यात आली आहे. यात मुलुंडमधील रिद्धी सिद्धी डेव्हलपर्सच्या तांबेनगर येथील आशीर्वाद व सिद्धार्थनगर एस. आर. ए. हौ. सो. चा समावेश आहे. या इमारतीत ४०० घरांसाठी सिंगल फेस वीज मीटर लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले होते.
महावितरणच्या मुलुंड विभागातील कार्यकारी अभियंता दत्तात्रय भणगे यांच्या नेतृत्वाखाली तातडीने काम सुरु करून एका दिवसात १६७ वीज मीटर तसेच ५ थ्री फेस मीटर पाणीसाठी मोटर पंप व जिनावरच्या लाईटसाठी लावण्यात आले. उर्वरित २३३ मीटर लावण्याचे काम सुरु असून ते लवकर पूर्ण करण्यात येईल. भांडूप परिमंडलाच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांनी कोरोनाच्या संकटात आपल्या कर्तव्य बजावणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. त्यांना आवश्यक खबरदारी घेऊन काम करण्याचा सल्ला दिला आहे.