मुलुंड कचराभूमी उद्यापासून बंद; भार आता देवनार, कांजूरवर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 06:33 AM2018-09-30T06:33:46+5:302018-09-30T06:34:08+5:30
कचरा प्रश्न पेटणार : मुलुंडपाठोपाठ देवनारचीही क्षमता संपत आली
मुंबई : मुंबईतील कचऱ्याचा भार उचलणाऱ्या प्रमुख कचराभूमींपैकी एक असलेल्या मुलुंड डम्पिंग ग्राउंडचे दरवाजे सोमवारपासून बंद होत आहेत. या डम्पिंग ग्राउंडवर दररोज जमा होणारा दीड हजार मेट्रिक टन कचरा आता कांजूरमार्ग व देवनार डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात येणार आहे. मात्र मुलुंडपाठोपाठ देवनार डम्पिंग ग्राउंडचीही क्षमता संपत आल्याने मुंबईत ऐन सणासुदीत कचरा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षभरात महापालिकेने हाती घेतलेल्या उपाययोजनांमुळे मुंबईतून जमा होणाºया कचºयाचे प्रमाण दोन हजार ३०० मेट्रिक टन एवढे घटले आहे. त्यामुळे आता दररोज सुमारे सात हजार २०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. हा कचरा मुलुंड, कांजूर व देवनार कचराभूमीवर टाकण्यात येतो. यापैकी २४ हेक्टर्स जागेवरील मुलुंड डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपुष्टात आली आहे. या डम्पिंग ग्राउंडमुळे स्थानिक रहिवाशांचे आरोग्य बिघडले आहे. त्यामुळे
हे डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिकांकडून होत होती. त्यानुसार १ आॅक्टोबरपासून मुलुंड डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकणे बंद करण्यात येणार आहे. यासाठी पालिका ७३१ कोटी रुपये खर्च करणार आहेत. गेल्या दीड वर्षापासून मुलुंड डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी महापालिकेला ठेकेदारच मिळत नव्हता. अखेर ठेकेदार मिळाल्याने हे डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यात येणार आहे. सध्या मुलुंड डम्पिंग ग्राउंडवर दीड ते दोन हजार मेट्रिक टन कचरा टाकला जात आहे. त्यामुळे हे डम्पिंग ग्राउंड बंद झाल्यानंतर हा कचरा देवनार आणि कांजूरमार्ग येथे वळविण्यात येणार आहे.
७० लाख मेट्रिक टन कचरा उपसणार!
मुलुंड कचराभूमीवरील ७० लाख मेट्रिक टन कचरा उपसण्यासाठी महापालिकेने जूनमध्ये ठेकेदार नेमला. त्यानुसार पुढील सहा वर्षांत ७३१ कोटी रुपये खर्च करून टप्प्याटप्प्याने मुलुंड कचराभूमी बंद करण्यात येणार आहे.
याआधी मुलुंड कचराभूमी बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी महापालिकेने अनेक वेळा निविदा मागविल्या. मात्र ठेकेदारांनी स्वारस्य न दाखवल्याने हा प्रकल्प रखडला होता. अखेर तीन वेळा निविदा मागविल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात एका ठेकेदाराने मुलुंड कचराभूमी बंद करण्याच्या कामात स्वारस्य दाखवले आहे.