मैदानावर क्राँक्रिटीकरण, मुलुंडमधील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 07:06 AM2018-05-09T07:06:43+5:302018-05-09T07:06:43+5:30
मुलुंड पूर्वेकडील मुलुंड जिमखाना येथील राजे संभाजी मैदानात महापालिकेकडून सिमेंट-काँक्रिटीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. स्थानिकांना श्वास घेण्यासाठी एकमेव राजे संभाजी मैदान शिल्लक राहिले असून पालिकेच्या या बांधकामाला मुलुंडवासीयांनी तीव्र विरोध केला आहे.
मुंबई : मुलुंड पूर्वेकडील मुलुंड जिमखाना येथील राजे संभाजी मैदानात महापालिकेकडून सिमेंट-काँक्रिटीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. स्थानिकांना श्वास घेण्यासाठी एकमेव राजे संभाजी मैदान शिल्लक राहिले असून पालिकेच्या या बांधकामाला मुलुंडवासीयांनी तीव्र विरोध केला आहे. या प्रकरणात काही सजग नागरिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर पालिकेला चपराक देत न्यायालयाने बांधकामाला स्थगिती दिली आहे.
मुलुंडमध्ये राजे संभाजी मैदान हे एकमेव मोठे मातीचे मैदान आहे. मात्र महापालिकेकडून त्यावर सुशोभीकरणाच्या नावाखाली सिमेंट- काँक्रिटीकरण करण्यात येत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ºहास होत असल्याने मुलुंडवासीयांकडून या कामाला कडाडून विरोध होतोय. या बांधकामात स्केटिंग ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक, बास्केट बॉल व व्हॉलिबॉल मैदान बनवण्याची पालिकेची योजना आहे. मात्र चिंतामणी बागेत स्केटिंगसाठी ट्रॅक असताना राजे संभाजी मैदानात स्केटिंग ट्रॅक बनविण्याची काय आवश्यकता आहे, असा सवाल ज्येष्ठ खेळाडू किरण साठे यांनी उपस्थित केला आहे. बांधकामाच्या नावाखाली महापालिकेकडून मैदान नष्ट करण्याची पावले उचलली जात असल्याचा आरोप साठे यांनी केला आहे.
या मैदानावर बांधकाम केल्यास शालेय विद्यार्थी आणि मुलुंडवासींनी कुठे जायचे, असा सवाल उपस्थित झाला आहे. परिणामी, मातीचे मैदान वाचविण्यासाठी स्थानिक निलांबरी देसाई यांनी लोकांना एकत्र करत तीव्र लढा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
मातीचे मैदान अधिक गरजेचे!
मातीचे मैदान असल्यामुळे येथे पावसाळ्यात पाणी साचते. त्यामुळे पाण्याचे स्रोत असलेले मैदान आहे. येथे सुट्टीच्या दिवशी हजारोंच्या संख्येने नागरिक येतात. मैदानी वातावरणाचे सुख अनुभवतात. मुलुंडमध्ये एकमेव मैदान असल्यामुळे राजे संभाजी मैदान सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मात्र महापालिकेकडून सिमेंट काँक्रिटीकरण करून पर्यावरणाचा ºहास करण्यात येत आहे. जॉगिंग ट्रॅक मैदानात बनविल्यास येथे क्रिकेट खेळत असलेल्या खेळाडूंचा सिजन बॉल लागून दुखापत होण्याची शक्यता आहे. मातीचे मैदान राखण्यासाठी मुलुंडवासी ठाम आहेत.
- चेतन साळवी, मुलुंड जिमखाना
मातीचे मैदान शहराचे वैभव आहे. त्यामुळे ते जपणे आवश्यक आहे. मी नगरसेवक असताना मैदानावर अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत. मात्र आताच्या लोकप्रतिनिधींमार्फत खूप वाईटरीत्या मैदानाला सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. खेळाचे मैदान हे मातीचे असायला पाहिजे. त्यामुळे यासाठी उच्च न्यायालयाच्या माध्यमातून सिमेंट काँक्रिटीकरणाचा गैरप्रकार रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- शिशिर शिंदे , माजी आमदार
मुलुंडवासीयांचा या बांधकामाला सकारात्मक पाठिंबा आहे. जॉगिंग ट्रॅक आणि बॉस्केटबॉलसाठी सिमेंटचे आवरण असलेले मैदान बनविण्यात येत आहे. फुटबॉल, व्हॉली बॉल, खो-खो, स्केटिंग टॅÑकची जागा बनविण्यात येणार आहे. येथे सिमेंटचे बांधकाम ५ टक्केदेखील होणार नाही. फुटबॉलसाठी सिमेंटचे बांधकाम करून पुन्हा त्या जागेवर माती टाकण्यात येणार आहे. जनतेच्या पैशांतून जनतेचे काम करण्यात येणार आहे. मुंबईतील दुसऱ्या क्रमांकाचा जॉगिंग ट्रॅक बनविण्यात येणार आहे. न्यायालयात आता आम्ही आमची बाजू मांडणार आहोत.
- रजनी केणी, स्थानिक नगरसेविका