रविवारी मुलुंड - माटुंगा होणार ब्लॉक
By admin | Published: April 4, 2015 10:54 PM2015-04-04T22:54:54+5:302015-04-04T22:54:54+5:30
मध्य रेल्वेच्या मुलुंड-माटुंगा अप धीम्या स्थानकांदरम्यान तसेच हार्बरच्या कुर्ला-मानखुर्द स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
डोंबिवली : मध्य रेल्वेच्या मुलुंड-माटुंगा अप धीम्या स्थानकांदरम्यान तसेच हार्बरच्या कुर्ला-मानखुर्द स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. हे ब्लॉक अनुक्रमे सकाळी ११.१५ ते दु. ३.१५ आणि स. ११.३० ते दु. ३.३० या वेळेत घेण्यात येणार आहेत.
या ब्लॉकमुळे वरील स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरील वाहतूक मुलुंड-माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. त्या कालावधीत अप धीम्यावर गाड्या थांबणार नाहीत. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जनसंपर्क विभागाने केले आहे. फलाटांअभावी या कालावधीत नाहूर, कांजुरमार्ग आणि विद्याविहार स्थानकांमध्ये अप मार्गावर लोकल थांबणार नसल्याचेही स्पष्टीकरण मध्य रेल्वेने दिले आहे.
हार्बरच्या कुर्ला-मानखुर्द स्थानकांदरम्यान अप/डाऊन मार्गांवर मेगाब्लॉक असल्याने पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसटीसाठी व तेथून या मार्गावर जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी पनवेल-मानखुर्द आणि कुर्ला-सीएसटी स्थानकांदरम्यान दोन्ही दिशांवर विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. तसेच हार्बरच्या प्रवाशांना स. १० ते दु. ४ या वेळेत ट्रान्स-हार्बरमार्गे अथवा मुख्य मार्गावरून आहे त्याच तिकीट, पासावर प्रवासाची मुभा असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)