मुलुंड-ठाणेकरांना मिळणार नवीन अद्ययावत रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 02:30 AM2019-02-19T02:30:26+5:302019-02-19T02:30:41+5:30
एम.टी. अग्रवाल रुग्णालयाचा विस्तार : दहा मजल्यांच्या इमारतीत ४७० रुग्ण खाटा
मुंबई : अडीच वर्षांच्या विलंबानंतर अखेर पूर्व उपनगरातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत. मुलुंड येथील एम.टी. अग्रवाल रुग्णालयाची विद्यमान इमारत पाडून त्या जागेवर दहा मजल्यांची इमारत उभारण्यात येणार आहे. या नवीन रुग्णालयात ४७० खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे. तीन वर्षांत हे रुग्णालय उभे राहणार आहे. यामुळे पूर्व उपनगरातील रुग्णांबरोबरच ठाणेकरांनाही दिलासा मिळणार आहे.
महापालिकेच्या केईएम, सायन आणि नायर या तीन प्रमुख रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असतात. हा ताण कमी करण्यासाठी पालिकेने उपनगरीय रुग्णालयांना अद्ययावत करण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेतला. पूर्व उपनगरात पालिकेच्या राजावाडी रुग्णालयानंतर मुलुंडचे एम.टी. अग्रवाल हे एकमेव प्रशासनाचे रुग्णालय आहे़ भांडुप, नाहूर एवढेच नव्हेतर, ठाण्यातील गरीब रुग्णही अनेकवेळा या रुग्णालयातच उपचारासाठी धाव घेतात. त्यामुळे या जागेवर सुपर स्पेशालिटी रुग्णालय बांधण्याचा निर्णय २०१६ मध्ये घेण्यात आला.
भांडुप परिसरातही सहाशे खाटांचे नवीन रुग्णालयात बांधण्याचे ठरले. हा प्रस्ताव लांबणीवर पडला आणि हे काम रखडले. प्रमुख रुग्णालयांवरील ताण वाढतच असल्याने अखेर अग्रवाल रुग्णालयाची इमारत पाडून त्या जागेवर नवीन इमारत बांधण्याचे निश्चित झाले आहे. या इमारतीमधील खाटांची क्षमता ६० टक्क्यांनी वाढविण्यात येणार आहे. यासाठी तब्बल चारशे कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
असे असेल नवीन रुग्णालय...
मुलुंड गाव येथे अग्रवाल रुग्णालयाची नवीन इमारत उभी राहणार आहे. या इमारतीचा आराखडा व नकाशे बनविण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून मे. स्कायलाईन आर्किटेक्स् यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान इमारती पाडून बेसमेंट, खालील तळमजला, वरील तळमजला अधिक दहा मजले अशी ही इमारत असणार आहे. या इमारतीत अद्ययावत सुविधा पुरविण्यात येणार आहे़ जेणेकरून रुग्णांना त्रास होणार नाही़
१५ लाख रुग्णांना होईल लाभ
च्सध्या एम.टी. अग्रवाल रुग्णालयांत दोनशे रुग्ण खाटा
आहेत. नवीन इमारतीत ४७० खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
च्अद्ययावत वैद्यकीय सेवेमुळे या रुग्णालयात दरवर्षी सरासरी १५ लाख रुग्ण उपचार घेऊ शकतील, असा विश्वास पालिका अधिकारी व्यक्त करीत आहेत.