मुंबई: पूर्व द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना आणखी गुळगुळीत आणि चकाचक रस्त्यावरून प्रवास करायला मिळणार आहे. एमएमआरडीएने मुलुंड जकात नाका ते ठाणे गोल्डन डाईज जंक्शन, माजीवडा पर्यंत महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठी निविदा मागवल्या असून एमएमआरडीए यासाठी २ कोटी ६८ लाख रुपये मोजणार आहे.
मुंबईतील पूर्व द्रुतगती महामार्ग व पश्चिम द्रुतगती महामार्ग एमएमआरडीएने पालिकेला हस्तांतरित केले असून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील माहीम ते दहिसर चेक नाका २५.२३ किमी तर पूर्व द्रुतगती महामार्गावरील सायन ते मुलुंड चेक नाका १८.७५ किमी मार्ग पालिकेच्या ताब्यात आला आहे या महामार्गाची देखभाल दुरुस्ती पालिका करणार असून उर्वरित महामार्गाची देखभाल दुरुस्ती एमएमआरडीएकडून केली जाणार आहे. त्यापैकी एमएमआरडीएने मुलुंड जकात नाका ते ठाणे गोल्डन डाईज जंक्शन, माजीवडा पर्यंत महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठी निविदा मागवल्या आहेत. पावसाळ्यासहित १२ महिन्यांच्या कालावधीसाठी कंत्राटदार कंपनीला रस्त्याची देखभाल करावी लागणार आहे. २ कोटी ६८ लाख १६ हजार १६४ रुपये एमएमआरडीए यासाठी मोजणार आहे तर इच्छुक कंपन्यांना १८ डिसेंबर पर्यंत निविदा भरता येणार आहे.